घन:श्याम कडू (उरण)
येथे सुरू करण्यात आलेले कोविड केअर सेंटर काही कारणास्तव बंद होते. याची तक्रार आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे करताच त्यांनी तातडीने या सेंटरमध्ये वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नेमणुका करून ते पूर्ववत सुरू केले आहे. यामुळे उरणकरांना आता कोरोना कोविड १९ ची तपासणी करण्यास बाहेर जाण्याची गरज नाही.जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना विषाणू संक्रमण हा जागतिक साथीचा रोग म्हणून घोषित केला आहे. त्या अनुषंगाने कोरोना विषाणू संक्रमण वाढणार नाही या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करणे आवश्यक आहे. त्यासाठी संपूर्ण व्यवस्था व नियोजन करण्यासाठी संपुर्ण जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात निहाय कोविड १९ कोविड केअर सेंटर स्थापन करण्यात आले आहे. या कोविड १९ कोविड केअर सेंटरवर सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन यांनी दिलेल्या मार्गदर्शन सूचनांच्या अंमलबजावणी तालुक्यातील तालुका अधिकारी यांनी त्यांचे कार्य क्षेत्रामध्ये आवश्यक त्या उपाययोजना करून घ्यावयाच्या आहेत. कोविड १९ कोविड केअर सेंटरमध्ये या आदेशानुसार खालील वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नेमणुका करण्यात आल्या आहेत.
उरण तालुक्यातील केअर पॉईंट हॉस्पिटल बोकडविरा येथे प्रमुख म्हणून तालुका वैद्यकीय अधिकारी आहेत. तर वैद्यकीय अधिकारी म्हणून डॉ. लतिका पोवळे, डॉ. सहयोगी भोईर, डॉ. सुशील पाटील, तर आरोग्य सेविका महिला म्हणून विलासिनी खोर्वेकर, सुनीता शिंदे, हिरा बोर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
या कोविड केअर सेंटरमध्ये कोरोना पॉजेटीव्ह रुग्ण तपासणी करून दाखल करणे, दाखल असलेल्यांची वैद्यकीय देखभाल, तपासणी व आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देणे, रुग्णांना पिण्याच्या पाण्याची सोय करणे, स्वच्छता राखणे, दैनंदिन अहवाल संध्याकाळी ५ वाजेपर्यंत जिल्हा आरोग्य कार्यालयाच्या इमेलवर पाठविणे असे आदेश जिल्हा आरोग्य अधिकारी सुधाकर माटे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे.
उरण येथे सुरू झालेले कोविडचे हॉस्पिटल काही अधिकाऱ्यांच्या मनमानी पणामुळे बंद झाले होते. परंतु आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या कानी तक्रार जाताच त्यांनी येथील अडचण दूर केल्याने हॉस्पिटल पूर्ववत सुरू झाले आहे. यामुळे कोरोनाची तपासणी येथेच होऊन पॉजेटीव्ह आढळल्यास त्यांना येथेच उपचार करण्यात येणार असल्याचे समजते.
याबाबत तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र इटकर यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे देत बोलण्यास नकार दिला. यामुळे या अधिकारी वर्गाच्या ध्यानीमनी काय आहे. याचा थांगपत्ता लागत नाही.
Comments
Post a Comment