माथेरानमध्ये कोरोनाच्या शिरकावाने नागरिक भयभीत!

माथेरानमध्ये कोरोनाच्या शिरकावाने नागरिक भयभीत!


मुकुंद रांजाणे (माथेरान)

जनतेने सढळ हाताने दिलेल्या सत्तेचा सदुपयोग करण्याऐवजी अंतर्गत मतभेदांमुळे गावाचा विकास तर दूरच प्रत्येक कार्यात आपल्याला कशाप्रकारे श्रेय मिळेल याकडे सध्यातरी राजकीय मंडळींचा कल अधिक प्रमाणात दिसत असून आपण करीत असलेले कार्य सर्वाधिक लोकप्रिय आहे अशा आणाभाका आणून एकप्रकारे जनतेलाही वेठीस धरून आपली पोळी भाजून घेण्यासाठी खटाटोप सुरू असल्याचे स्पष्ट चित्र माथेरान सारख्या अगदी छोटयाशा गावात पहावयास मिळत आहे.
      कोरोनाच्या महाभयंकर आजाराने जगासह देशात थैमान घातलेले असताना प्रत्येक नागरिक आपल्या कुटुंबाची जबाबदारी पार पाडत असताना इथे मात्र ही बाब गांभीर्याने घेतली गेली नसल्याने माथेरान बाहेर अडकलेल्या स्थानिकांना तसेच आपल्या मर्जीतील लोकांना हळूहळू गावात प्रवेश देण्यात आला.त्यातच ज्यांचा या गावाशी मागील चार वर्षांपासून कामाच्या माध्यमातून संबंध आलेला आहे अशा मुंबई मधील संवेदनशील भागांतून आलेल्या दांपत्याला अनावधनाने राजकीय वरदहस्ताने की प्रशासकीय चुकीमुळे प्रवेश दिल्यामुळे आलेल्या एका कुटुंबाने चक्क कोरोनाचा प्रसाद वाटण्यास सुरुवात केली आहे. त्या कुटुंबातील दोन सदस्यांना कोरोनाची लागण झाली असून अन्य चार जणांना सुद्धा नकळत या लागणीला सामोरे जावे लागले आहे.यामध्ये एकूण तीन महिला,एक पुरुष  एक मुलगी आणि एका डॉक्टरचा समावेश आहे.त्यातच मध्यंतरी प्रत्येक विभागवार वैद्यकीय शिबीर आयोजित करण्यात आले होते त्यावेळी आणखीन कुणाला नकळत लागण झाली आहे की काय अशी भीती सुध्दा यानिमित्ताने व्यक्त केली जात आहे.
माथेरानला लॉक डाऊन केल्यापासून पोलीस निरीक्षक प्रशांत काळे, पोलीस शाम जाधव, राहुल पाटील हे आपल्या अन्य सहकाऱ्यांसोबत आपली जबाबदारी चोखपणे बजावत होते त्यामुळे दोन महिने माथेरान वासीय निर्धास्तपणे वावरत होते नियमांचे काटेकोरपणे पालन करत होते.नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांनी सुध्दा वेळोवेळी सतर्क राहण्याचे आवाहन नागरिकांना केलेले आहे.परंतु कोरोनाच्या झालेल्या आगमनामुळे नागरिकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. आजच्या घडीला माथेरानकर पूर्णतः भीतीच्या दडपणाखाली वावरताना दिसत आहेत.मुंबई मधून आलेल्या त्या कुटुंबातील सदस्यांच्या संपर्कात आणखीन किती व्यक्ती आलेल्या आहेत याबाबत अद्यापही प्रशासनाने खुलासा केलेला नाही त्यामुळे कोरोनाची लागण अजून काही दिवसांत हळूहळू वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.लॉक डाऊन मुळे आर्थिकदृष्ट्या पूर्णपणे हतबल झालेल्या नागरिकांना काही दानशूर व्यक्तींच्या माध्यमातून मिळणा-या अपुऱ्या जीवनावश्यक वस्तूंच्या मदतीवर गुजराण करावी लागत आहे.शिल्लक जमापुंजी संपल्यामुळे मात्र यामध्ये मध्यमवर्गीय लोकांचे खुप हाल होत आहेत.त्यांचाही विचार करणे आवश्यक आहे परंतु तसे केले जात नाही ही खरोखरच शोकांतिका असल्याचे बोलले जात आहे. यापुढे नागरिकांनी कोरोना सोबतच जगण्याची उमेद राखली, तरच पुढील जीवन व्यथित होऊ शकते.
--------------------------------------------------------------------------------------------------------------------
        सुरुवातीपासून ज्या ज्या वेळेस केवळ राजकीय वरदहस्ताने मर्जीतील लोकांना गावात प्रवेश देण्यात आला होता त्यावेळी त्यांना स्वतंत्ररित्या गावाबाहेर असलेल्या महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळच्या खोल्यात सर्वानाच कोरोन्टाईन करणे आवश्यक होते परंतु तसे केले गेले नाही. कुठल्याही प्रकारचे ठोस नियोजन नसल्यामुळे गावात कुणी गपचूप आले होते तर कुणाला घरातच कोरोन्टाईन करण्यात आले होते त्यामुळे खूपच लोकांनी इथे हजेरी लावली होती. लग्न होऊन गेलेल्या मुली, नातेवाईक सुध्दा मुलाबालांसोबत आपला जीव वाचविण्यासाठी माथेरान मध्ये दाखल झाले होते.मतांच्या राजकारणापायी गावात यामुळेच विकतचे दुखणे गावात सर्वत्र  पसरले आहे. तर कुणी आपल्या पदाचा गैरवापर करून कोरोनाच्या आगमनासाठी कवाडे खुली केली आहेत इथल्या एकंदरीतच चतुर्थ श्रेणीच्या गलिच्छ राजकीय खेळीचा परिणाम सर्वसामान्य गोरगरीब नागरिकांना सोसावा लागत आहे.सध्यातरी गावातील प्रत्येक प्रभागातील नागरिकांनी आपल्या सुरक्षेसाठी रस्ते पत्रे,तारेचे कुंपण लावून बंद केले आहेत जेणेकरून कुणाही संक्रमित व्यक्तीचा शिरकाव होणार नाही. प्रशासनावर अवलंबून न राहता स्वतःची काळजी नागरिक स्वतःच घेत आहेत.

Comments