माणगावात सोमवारपासून पाच दिवस 'जनता कर्फ्यु'


कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे सर्वांचा एकमुखी निर्णय


सलीम शेख (माणगाव)
          गेल्या दहा ते पंधरा दिवसांपासून लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्यात माणगाव नगरपंचायत हद्दीत कोरोनाच्या रुग्ण संख्येत वाढ होत असल्याने माणगावकर नागरिकांनी आता या विषाणूची चांगलीच धास्ती घेतली आहे. शुक्रवारी सायंकाळी हद्दीत एकाच दिवशी कोरोनाचे ७ नवे रुग्ण आढळल्याने शनिवारी दि. २७ जून २०२० रोजी माणगावकर नागरिकांनी याची खबरदारी घेण्याच्या हेतूने सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून  एकत्रित येत  सोमवार दि. २९ जून ते शुक्रवार दि. ३ जुलै २०२० पर्यंत 'जनता कर्फ्यु' लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.
          नगरपंचायत कार्यालय याठिकाणी माणगाव नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा, उपनगराध्यक्ष,नगरसेवक, मुख्याधिकारी, प्रतिष्ठित नागरिक, विविध पक्षाचे नेते, कार्यकर्ते, व्यापारी वर्ग, पत्रकार, औषध विक्रेते, संस्थेचे पदाधिकारी यांनी सुरक्षित अंतर ठेवून माणगावात कोरोनाच्या वाढत्या संसर्गाबाबत चर्चा केली. या चर्चेत सोमवारपासून शुक्रवारपर्यंत सलग पाच दिवस कडकडीत बंद ठेवून जनता कर्फ्यु करण्याचा निर्णय घेण्यात आला, यावेळी औषध विक्रेते संघटनेचे पदाधिकारी निलेश शेट यांनी कोरोनाचे माणगावात वाढते रुग्ण पाहून चिंता व्यक्त करीत आम्ही औषधे दुकाने पाच दिवस बंद ठेवू. ज्यांना कोणाला औषधांची गरज भासेल त्यांच्यासाठी आमचे दुकानदार दुकानांच्या बाहेर आपले नाव व संपर्क क्रमांक लिहीतील. गरजूंनी संपर्क साधल्यास त्यांना ताबडतोब औषधे उपलब्ध करून दिली जातील असे सांगितले. तसेच या चर्चेत फक्त परवानाधारक दूध डेअरीवाले यांची दुधाची दुकाने  सकाळी ६ ते ९ यावेळेतच जनता कर्फ्युच्या ५ दिवसांमध्ये उघडी राहतील. दुध डेअरीवाले यांना वरील कालावधीत व वेळेत केवळ दुध विकण्याचे बंधनकारक करण्यात आले आहे. अन्यथा इतर सर्व दुकाने बंद ठेवून कडकडीत बंद ठेवण्याचा निर्णय  घेण्यात आला आहे. याकरिता सर्व माणगावकरांनी सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे. या चर्चेमध्ये नगराध्यक्षा  योगिता चव्हाण, राजीपचे माजी शिक्षण व आरोग्य सभापती अँड. राजीव साबळे, ज्ञानदेव पवार, उपनगराध्यक्ष दिलीप जाधव, नगरसेवक रत्नाकर उभारे, नितीन वाढवळ, नितीन बामगुडे, सचिन बोंबले, माणगाव तालुका खरेदी विक्री संघाचे सभापती निलेश थोरे, भाजपचे तालुका सरचिटणीस योगेश सुळे, माजी ग्रामपंचायत महामूद धुंदवारे, व्यापारी सचिव शरद देसाई, सुरेश जैन, गिरीश वडके, नरेंद्र गायकवाड, दिनेश मेथा, नगरपंचायतीचे मुख्याधिकारी राहुल इंगळे, सुनील पवार यांच्यासह प्रतिष्ठित नागरिक व व्यापारी उपस्थित होते.

Comments