माणगाव तालुक्यात १५ नवे रुग्ण

बाधीतांची संख्या २८ ; सर्वत्र चिंतेचे वातावरण

सलीम शेख (माणगाव)
          जगभरात कहर केलेल्या कोरोना विषाणूने सर्वच ठिकाणचे जनजीवन विस्कळित झाले आहे. गेली चार महिने देशवासीय या विषाणूला लढा देत आहेत. रायगड जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण दरदिवशी वाढत असल्याने जिल्हावासीय टेन्शनमध्ये आहेत. जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका समजला जाणाऱ्या माणगाव तालुक्यात गेल्या दोन महिन्यापासून कोरोना विषाणूने अक्षरक्षः कहर केला आहे. दोन महिन्यात तालुक्यातील २८ गावांतून आजपर्यंत ९४ जणांना कोरोनाची लागण होऊन त्यापैकी ६४ जण बरे झाले असून दोघांचा मृत्यू झाला आहे. सध्या तालुक्यात बाधीतांची संख्या २८ आहे. तालुक्यात माणगाव नगरपंचायत हद्दीत रविवार दि. २८ जून २०२० रोजी नवे ८ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून तालुक्यातील हेदमलई येथील दोन रुग्ण तर माणगाव जवळील इंदापूर गावांत ५ नवे रुग्ण अशा एकूण १५ रुग्णांचे कोरोना रिपोर्ट रविवारी पॉझिटिव्ह आल्याने तालुकावासीयांची चिंता वाढली आहे.
             माणगाव नगरपंचायत हद्दीतील उपजिल्हा रुग्णालय माणगाव व तहसील कार्यालय या सरकारी कार्यालयातून कोरोनाचे रुग्ण काही दिवसांपूर्वी    आढळले असून आता घरातून कोरोना रुग्ण आढळत आहेत. रुग्णांमध्ये लहान बाळापासून ते वयस्कर मंडळींचा तालुक्यात समावेश आहे. माणगावात ११ व १३ वयोगटातील मुला, मुलींना कोरोनाची लागण झाल्याने सर्वांच्या चिंतेत अधिकच भर पडली आहे. माणगावसह तालुक्यातील नागरिकांनी कोरोनाचे गांभीर्य लक्षात घेऊन सरकारने वेळोवेळी केलेल्या सुचनेनुसार प्रशासनाच्या आवाहनाला साथ देऊन कामा व्यतिरिक्त घराबाहेर न पडता जास्तीत जास्त वेळ घरात रहा, सुरक्षित रहा असे आवाहन तालुक्याच्या प्रांताधिकारी प्रशाली जाधव दिघावकर यांनी केले आहे.

Comments