क्वारंटाईनचा गैरसमज दूर करण्यासाठी जनजागृती करावी -किशोर जैन



महेंद्र म्हात्रे
            नागोठणे : शहरासह विभागातील गावांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढण्यास सुरुवात झाली आहे. आपल्या सर्वांसाठी ते घातक ठरण्याची शक्यता आहे. आजही नव्याने माणसे येत असून त्याची ग्रामपंचायत कार्यालयाकडे नोंद होत नसून १४ दिवस क्वारंटाईन राहावे लागेल ही त्यांना भीती सतावत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे त्यांच्यातील क्वारंटाईनचा गैरसमज दूर करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राने प्रत्येक गावात जनजागृती करावी असे आवाहन जिल्हा परिषद सदस्य तथा स्थानिक रुग्ण कल्याण समितीचे अध्यक्ष किशोर जैन यांनी केले.
         येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या स्थानिक रुग्ण कल्याण समितीची बैठक आज सोमवारी आरोग्य केंद्राच्या सभागृहात पार पडली त्यावेळी किशोर जैन बोलत होते. या सभेला तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अभय ससाणे, सरपंच डॉ. मिलिंद धात्रक, रोहे पंचायत समितीचे सदस्य संजय भोसले, तालुका शिक्षण अधिकारी सादुराम बांगरे, वैद्यकीय अधिकारी डॉ. चेतन म्हात्रे, डॉ. स्नेहल कोळी, यशवंत कर्जेकर, संदीप दळवी, समितीच्या सदस्य वीणा घासे, ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर साळुंके आदींसह प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी उपस्थित होते. महामार्गाच्या कामात आरोग्य केंद्राची संरक्षक भिंत तोडण्यात आली असून सुरक्षेच्या दृष्टीने ती बांधण्यात यावी अशी मागणी डॉ. स्नेहल कोळी यांनी या बैठकीत केली. विभागातील अनेक गावे पेण तालुक्यात येत असली तरी, त्यांना पोलीस ठाण्यात किंवा बाजारहाट करण्यासाठी नागोठण्यातच यावे लागते. मात्र, या गावांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून येत असले तरी नागोठणे आरोग्य केंद्रात त्याची माहिती उपलब्ध होत नसल्याने उद्याच्या जिल्हा परिषदेच्या बैठकीत हे निदर्शनास आणून देणार असल्याचे किशोर जैन यांनी स्पष्ट केले. येथील रिलायन्स कंपनीतील बहुसंख्य लोकांचा तसेच कर्मचारी आणि कामगारांचा नागोठण्याशी संबंध येत असल्याने कंपनीने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कठोर अंमलबजावणी करण्यासाठी त्यांचे लक्ष वेधणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
               कोरोनाच्या संदर्भात प्राथमिक आरोग्य केंद्राने मंगळवारपासून जनजागृतीची नव्याने मोहीम राबवावी अशी सूचना डॉ. ससाणे यांनी केली. प्राथमिक आरोग्य केंद्रात कर्मचाऱ्यांच्या अनेक जागा रिक्त असून रिकाम्या जागा भरून काढण्यासाठी प्रयत्न करावा अशी सूचना वजा विनंती डॉ. चेतन म्हात्रे यांनी केली. कोरोनाच्या धावपळीत येथील रुग्णवाहिका सुस्थितीत ठेवणे गरजेचे असून तातडीने त्याची दुरुस्ती करण्यासाठी आरोग्य विभागाचे लक्ष वेधले जाईल व येथे कायमस्वरूपी १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका उपलब्ध होण्यासाठी शासकीय पातळीवरून प्रयत्न करणार येणार असल्याचे जैन यांनी यावेळी स्पष्ट केले. आजूबाजूच्या कंपन्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण होऊ नये व असे रुग्ण आढळून आल्यास त्याची माहिती घेण्याची सूचना त्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्राला केली. या बैठकीत आशासेविका तसेच परिचारिका यांना मान्यवरांच्या हस्ते मास्क तसेच शिल्डचे वाटप करण्यात आले. प्रास्ताविक यशवंत कर्जेकर यांनी, तर आभारप्रदर्शन डॉ. अभय ससाणे यांनी केले.

Comments