कोविड रूग्णांवर उपचार करण्यास पॅनासिया हॉस्पीटलला बंदी

कोविड रूग्णांवर उपचार करण्यास पॅनासिया हॉस्पीटलला बंदी

पनवेल संघर्ष समितीच्या मागणीवर केली कारवाई


प्रतिनिधी
           पनवेल : कोविड परिस्थितीचा गैरफायद उठवत त्यांच्या नातेवाईकांकडून अव्वाच्या सव्वा बिलाची रक्कम उकळणार्‍या नवीन पनवेल येथील पॅनेसिया हॉस्पीटलवर पनवेल महापालिकेने पुढील आदेश होईपर्यंत परस्पर कोविड रूग्ण दाखल करून घेण्यास बंदी घातली आहे. पनवेल संघर्ष समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांनी दोन दिवसांपूर्वी पॅनासिया रूग्णालयातील खिसे कापू प्रकरण उघडकीस आणून डॉक्टर सुभाष सिंग आणि पॅनासिया रूग्णालयाबाबत मध्यरात्रीच महापालिका आयुक्त सुधाकरराव देशमुख, उपायुक्त जमिर लेंगरेकर उपायुक्त संजय शिंदे यांच्याकडे बिलाच्या कॉपीसह तक्रार केली होती.
           पॅनासिया हॉस्पीटलमध्ये शिरढोण येथील महिला रूग्णावर उपचार करताना अवघ्या २४ तासात ७४ हजार रूपयांचे बिल नातेवाईकांच्या हातावर ठेवले होते. त्यावेळी त्यांचे नातेवाईक मंगेश ठकेकर यांनी सामाजिक कार्यकर्ते कांतीलाल कडू यांच्याशी संपर्क साधला असता कडू यांनी हॉस्पीटलमधील निवासी डॉक्टरांशी संपर्क साधून हे प्रकरण भयानक असल्याने त्यांच्याविरोधात महापालिका आयुक्तांकडे तक्रार करणार असल्याचे सांगून रूग्णाला दिलासा देत तेथून सुटका करून घेतली होती.
           काल सायंकाळी देशमुख़ यांनी कडू यांच्या तक्रारीवरून पॅनासिया हॉस्पीटलमध्ये यापुढे पुढील आदेश होईपर्यंत कोविड रूग्णांवर परस्पर उपचार सुरू ठेवण्यास मज्जाव घातला आहे. याशिवाय कायद्याचे उल्लंघन केल्यास कारवाईला सामोरे जावे लागेल, अशी तंबही आयुक्त देशमुख यांनी दिली आहे.
 विशेष म्हणजे गेल्याच आठवड्यात पाच खासगी हॉस्पीटलला देशमुख यांनी कोविड रूग्णांवर उपचार करून देण्यास परवानगी दिल्यानंतर हॉस्पीटल प्रशासनाने रूग्णांच्या नातेवाईकांच्या मानेवरून धारदार सुरा फिरवण्यास प्रारंभ केला होता. सामाजिक कार्यकर्ते कांतीलाल कडू यांनी तो घृणास्पद प्रकार हाणून पाडला आहे.

Comments