माणगाव तालुक्यात ७ नवे कोरोनाग्रस्त


एकूण बधितांची संख्या ४७ ; ग्रामस्थ भयभीत


सलीम शेख
         माणगाव : तालुक्यात गेली दोन महिन्यांपासून कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत चालल्याने तालुक्यातील जनता भयभीत झाली आहे. तालुक्यात माणगाव नगरपंचायत हद्दीत २ रुग्ण, मोर्बा येथे २ रुग्ण, इंदापूर येथे २ रुग्ण तर कशेणे येथील १ रुग्ण अशा एकूण ७ रुग्णांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती माणगाव उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिक्ष्क डॉ. प्रदीप इंगोले यांनी शुक्रवार दि. ३ जुलै २०२० रोजी सकाळी प्रसार माध्यमांना  दिली. तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालल्याने ग्रामस्थांबरोबरच प्रशासनाचे टेंशन वाढत चालले आहे.
         माणगाव तालुक्यात आतापर्यंत ३२ गावांतून ११६ कोरोना रुग्ण आढळले असून त्यापैकी ६७ रुग्ण स्वतःच्या इच्छाशक्ती व प्रतिकार शक्तीच्या जोरावर पूर्णपणे बरे होऊन घरी गेले असून दोघांचा मृत्यू झाला आहे. सध्या तालुक्यात बाधित रुग्णांची संख्या ४७ आहे. माणगाव नगरपंचायत हद्दीत यापैकी सर्वाधिक रुग्ण असल्याने येथील ग्रामस्थ फारच चिंतेत आहेत. नगरपंचायत प्रशासनाने यापुढे माणगावात दुकानांतून होणाऱ्या गर्दीकडे विशेष लक्ष देणे गरजेचे असल्याची मागणी जनतेतून होत असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याची मागणी होत आहे. कोरोना संकटात माणगाव नगरपंचायतीचे जास्तीत जास्त बाजारपेठेत लक्ष घालून सातत्याने दंडात्मक कारवाई केल्यास याचा वचक सर्व दुकानदार व ग्रामस्थ यांच्यावर राहील असे कडक धोरण नगरपंचायतीचे तसेच पोलीस प्रशासनाने अवलंबविल्यास या विषाणूपासून माणगावकरांना मुक्ती मिळून सर्वजण सुखी आयुष्य जगतील असे बोलले जात आहे.

Comments