माणगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्षांची पक्ष नेतृत्वावर नाराजी
राजीनामा देण्याचे सूतोवाच!
महमूद धुंदवारे
सलीम शेख
माणगाव : शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष महमूद धुंदवारे यांनी पक्ष नेतृत्व तटकरे कुटुंबीयांंबद्दल प्रसार माध्यमांजवळ बोलताना नाराजी व्यक्त केली असून लवकरच आपण शहर अध्यक्षांचा राजीनामा देणार असल्याचे सांगितले.
महमूद धुंदवारे हे गेली तीन वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेतृत्वावर नाराजी व्यक्त करीत आहेत. शेवटी शनिवार, दि. ४ जुलै २०२० रोजी त्यांनी प्रसार माध्यमांना आपली प्रतिक्रिया देवून नाराजी व्यक्त करून शहर अध्यक्ष पदाचा राजीनामा देण्याचे संकेत दिले. प्रसार माध्यमांजवळ बोलताना धुंदवारे म्हणाले गेली १० वर्षे मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काम आमचे जवळचे स्नेही माजी नगराध्यक्ष आनंदशेठ यादव यांच्या मार्गदर्शनाखाली प्रामाणिकपणे करीत आलो. ग्रामपंचायत निवडणुकीत निवडून आल्यावर प्रभागातील समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर माझी माणगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. मी पक्षाचे इमाने, इतबारे प्रत्येक निवडणुकीत काम केले. मात्र अलीकडच्या काही वर्षामध्ये पक्ष नेतृत्व तटकरे कुटुंबीय आम्हाला जाणूनबुजून डावलत आहे. त्यामुळे माझे समर्थकही नाराज झाले आहेत. पक्षाचे काम आम्ही प्रामाणिकपणे करतो, पण पक्ष नेतृत्व हे आम्हाला डावलून अलीकडच्या काही काळात विरोधकांना जवळ करू लागले आहेत. मात्र निष्ठावंत कार्यकर्त्यांचा पक्ष नेतृत्वाला विसर पडू लागला असल्याने लवकरच आपण या पदाचा राजीनामा तालुकाध्यक्षांना पाठवून वेगळा विचार करणार असल्याचे संकेत देवून यापुढे आनंदशेठ यादव यांच्याशी चर्चा करून निर्णय घेवू असे स्पष्ट केले.
Comments
Post a Comment