आपत्ती व्यवस्थापनाचे अधिकारी कर्मचारी काढतात घरी झोपा

आपत्ती व्यवस्थापनाचे अधिकारी कर्मचारी काढतात घरी झोपा

पुरग्रस्तांकडून होते कारवाईची मागणी


अनंत नारंगीकर 
             जेएनपीटी : पावसाळ्यात उद्भवणाऱ्या पुर परिस्थितीतून रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी नेण्यासाठी तसेच पुर परिस्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली नेमण्यात आलेले आपत्ती व्यवस्थापनाचे अधिकारी कर्मचारी हे आप आपल्या मुख्यालयाच्या ठिकाणी वास्तव्य न करता घरी झोपा काढत आहेत. त्यामूळे सध्या रहिवाशांमध्ये नैराश्याची भावना निर्माण झाली आहे. तरी मुख्यालयाच्या ठिकाणी वास्तव्य न करणाऱ्या अशा शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी मनसेचे उरण तालुका उपाध्यक्ष सत्यवान भगत यांनी केली आहे.
            मागील वर्षीच्या पावसाळ्यात उरण तालुक्यातील जसखार, चिरनेर, वेश्वी, चिर्ले, जासई, केगाव, नवघर, सोनारी सह इतर अनेक गावात पुर परिस्थिती निर्माण झाली होती. या पुर परिस्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी आणि रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी ठेवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यानी जिल्ह्यातील प्रत्येक गावात आपत्ती व्यवस्थापनाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली होती. परंतु कामचुकारपणा करणारे आपत्ती व्यवस्थापनाचे अधिकारी हे आप आपल्या मुख्यालयाच्या ठिकाणी उशिराने पोहोचल्याने अनेक रहिवाशांच्या घरात पुराचे पाणी शिरुन रहिवाशांच्या जीवनावश्यक वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. यावेळी शासन, प्रकल्प अधिकारी आणि आपत्ती व्यवस्थापनाचे अधिकारी कर्मचारी यांच्या विरोधात पुरग्रस्तांमध्ये मोठ्या प्रमाणात संतापाची लाट उसळली होती.
        यावर्षीच्या पावसाळ्यात मागील वर्षीची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी उरण तालुक्यातील अनेक गावांत उद्भवणाऱ्या पुर परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी शासनाने, सिडकोने, जेएनपीटी बंदराच्या प्रशासनाने आपआपल्या हद्दीतील नाले सफाईची कामे उरकून घेण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. परंतु प्रशासकीय अधिकारी यांच्या दुर्लक्षितपणामूळे व ठेकेदारांच्या हम करो सो कामामुळे आज नाले सफाईची कामे अर्धवट स्थितीत पडून राहिली आहेत. तसेच नाल्याच्या दुरुस्तीची व नव्याने बांधण्यात आलेल्या संरक्षण भिंतीची कामेही तकलादू निकृष्ठ दर्जाची झाली आहेत. त्यामूळे यावर्षीच्या पावसाळ्यात तालुक्यातील अनेक गावांत पुर परिस्थिती निर्माण होणार अशी भिती रहिवाशी व्यक्त करत आहेत. मात्र पुर परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी नेमण्यात आलेले आपत्ती व्यवस्थापनाचे अधिकारी कर्मचारी हे पुरग्रस्ताना पुन्हा एकदा उद्भवणाऱ्या पुर परिस्थितीत लोटण्यासाठी जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या डोळ्यात धुळ फेक करत आप आपल्या मुख्यालयाच्या ठिकाणी वास्तव्य न करता आरामात आप आपल्या घरी मौजमजा करत झोपा काढत आहेत. यासंदर्भात ग्रामसेवक, तलाठी, मंडल अधिकारी, उरण पंचायत समिती आणि महसूल विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, ज्या-ज्या ठिकाणी पुर परिस्थिती किंवा नैसर्गिक संकट ओढावेल त्यावेळी उरण तहसील कार्यालयातून आम्हाला फोन येणार त्यावेळी आम्ही तात्काळ रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी ठेवण्यासाठी व पंचनामे करून घेण्यासाठी मुख्यालयाच्या ठिकाणी हजर राहणार आहोत.

Comments