महेंद्र म्हात्रे
नागोठणे : शहरासह विभागात कोरोनाच्या रुग्णांची संख्या काळजी करण्या इतपत वाढत असल्याचे निदर्शनास येत आहे. गंभीर बाब म्हणजे आपल्या कारखान्यातील कामगारांना आणि त्यांच्या कुटुंबियांना त्याची लागण होऊन तो विभागात पसरत असला तरी, आपणाकडून काहीच खुलासा होत नसल्याने जनतेच्या मनात संभ्रमाचे वातावरण निर्माण होत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना या परिस्थितीवर लक्ष ठेवून असून निवेदन मिळाल्यावर दोन दिवसांत आपलेकडून जनतेसमोर किंवा प्रसार माध्यमांसमोर जाहीर खुलासा करावा अन्यथा मनसे आपल्या पद्धतीने आंदोलन छेडून संबंधित प्रश्नांची उत्तरे देण्यास आपल्याला भाग पाडेल असा इशारा मनसेचे जिल्हा संघटक गोवर्धन पोलसानी यांनी रिलायन्स एनएमडीचे अध्यक्षांना निवेदनाद्वारे दिला आहे.
गोवर्धन पोलसानी
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे आदेशानुसार जिल्हा संघटक गोवर्धन पोलसानी यांनी नागोठणेसह विभागात वाढत असलेल्या कोरोनाच्या संख्येबाबत येथील रिलायन्स व्यवस्थापनाचे लक्ष वेधले असून त्यासंदर्भात पोलसानी यांनी पत्रकार परिषदेत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या घडामोडींची माहिती दिली. कोरोनाच्या वाढत्या संख्येबाबत रिलायन्स व्यवस्थापन कोणतीही माहिती जाहीर करीत नसून सरकारी यंत्रणांकडूनही माहिती येण्याची शक्यता नसल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. कंपनीचे मग्रूर व्यवस्थापन जनतेच्या भावनांचा विचार करण्याऐवजी माहिती दडविण्याचा प्रकार करीत आहे. एका वाहनचालकाला कंपनीच्या एका अधिकाऱ्याने खोटी माहिती देऊन कोरोनाची लागण असलेल्या रुग्णाला घेवून टुरिस्ट टॅक्सीतून नवी मुंबईतील रुग्णालयात पाठविले होते. यावर काही वृत्तपत्रांनी कंपनीच्या हम करे सो ... या वृत्तीवर कडक शब्दात टीका करूनही या कंपनीने गांभीर्याने घेतले नसल्याचे पोलसानी यांनी सांगितले. शासकीय यंत्रणांकडून कंपनीवर कारवाई होईल याबाबत सुतराम शक्यता नसल्याचे पोलसानी यांनी यावेळी स्पष्ट केले. राजसाहेब ठाकरे यांचा आदेश असल्याने अशा गंभीर विषयात आम्ही स्थानिक पदाधिकारी बघ्याची भूमिका घेत शांत राहणे शक्यच नाही. त्यामुळे कोरोनाबाबतची माहिती आपल्याकडून का दडविण्यात आली, सापडलेल्या रुग्णांबाबत आपण कोणती काळजी घेत आहात, बेणसे गावात एका व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे उघड झाल्यानंतर कंपनीने तेथे कोणती खबरदारी घेतली आहे, वारंवार मागणी होऊनही आपण जनतेसमोर किंवा प्रसार माध्यमांसमोर येवून माहिती का देत नाही, वाहन चालकाला खोटी माहिती देणाऱ्या अधिकाऱ्यावर कोणती कारवाई केली या प्रश्नांचा दोन दिवसांत खुलासा करण्याची मागणी निवेदनाद्वारे कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे केली आहे.
दरम्यान, या संदर्भात प्रतिक्रियेसाठी रिलायन्स इंडस्ट्रीज एनएमडीचे जनसंपर्क अधिकारी रमेश धनावडे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, " आम्ही कंपनी कामगारांची काळजी घेत आहोत व योग्य त्या उपाययोजनाही करत आहोत. तसेच वेळोवेळी शासनाकडे व कंपनी परिसरातील ग्रामपंचायतीकडे याविषयी आमच्याकडे असलेली माहिती पुरवत आहोत. बेणसे गावामध्ये घडलेली घटना ही कंपनीशी संबंधित नाही. त्याचप्रमाणे रिलायन्स वसाहतीतील एक कर्मचारी रूटीन चेकअपसाठी आमच्या दवाखान्यात आले होते. त्यांना पुढील तपासासाठी मुंबईला जाण्यासाठी डॉक्टरांकडून सांगण्यात आले. सदरहू व्यक्ती कोकिळाबेन रुग्णालय, घणसोली येथे गेल्यानंतर करण्यात आलेल्या टेस्टमधे ही व्यक्ती पॉझिटीव्ह आहे हे शासनातर्फे जाहीर करण्यात आले. ज्यावेळी त्या व्यक्तीस घणसोली येथील दवाखान्यात पाठविले त्यावेळी ती व्यक्ती नॉर्मल होती म्हणून आम्ही रुग्णवाहिकेतून न पाठविता त्या व्यक्तीला आमच्याकडे भाडेतत्वावर असलेल्या गाडीतून पाठविले होते. आमच्याकडे या संदर्भात असलेली माहीती आम्ही वेळोवेळी शासनाकडे कळवित असून कोणतीही माहीती लपवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही" असे त्यांनी स्पष्ट केले.
Comments
Post a Comment