रोहयात पावसाची जोरदार बॅटिंग

रोहयात पावसाची जोरदार बॅटिंग

चिंतातूर शेतकरी झाला आनंदीत 

मान्सून धो-धो बरसून लागल्याने भात लागवड करताना शेतकरी बांधव (छाया : नंदकुमार मरवडे)

नंदकुमार मरवडे 
            खांब-रोहे : गेली अनेक दिवस आकाशाकडे वाट पहात बसलेल्या शेतकरी राजाचा चेहरा मान्सून धो-धो बरसल्याने आनंदित झाला आहे. तर पावसाच्या दमदार सुरूवातीने लावणीच्या कामाला आता वेग आला असुन शेतकरी राजाची चिंता आता मिटल्याचे दिसून येत आहे.
             रायगड जिल्हा हे भाताचे कोठार असे म्हणतात.त्याचप्रमाणे रोहा तालुक्यात दुबार भातशेती असल्याने रोह्याला भाताचे कोठार म्हणणे वावगे ठरणार नाही. या वर्षी मान्सून वेळेवर सुरु होईल असा अंदाज वर्तविण्यात आला होता परंतू लावणी झाल्यानंतर पावसाने दडी मारली होती. त्यामूळे जून महिना कोरडाच गेल्याने रोपे सुकण्याची भिती निर्माण झाली होती. अखेर गेली दोन दिवस पाऊस सुरु झाल्याने शेतकरी सुखावला आहे. कोरोना काळात व्यापार उद्योग बंद आहेत, हाताला काम नाही असे असताना शेती करण्याचा निर्णय शेतकरी राजानी घेतला आहे. या पुढे रोह्यात शेती बहरणार आहे. पुर्वी न परवडणारी शेती आता भाताला भाव मिळत असल्याने परवडत आहे. सध्या भाताला रु. १४०० ते १८०० भाव मिळत आहे, तसेच शेतकरी नविन विकसित बियाण्यांचा वापर करित असल्याने तांदूळ सुद्धा चांगल्या प्रतिचा मिळत आहे. त्यामूळे अनेक वर्षानंतर भातशेतीला पुन्हा एकदा महत्व आले आहे. यामध्ये कृषी खात्याचे वेळोवेळी मार्गदर्शन मिळत असल्याचे पहावयास मिळत आहे. यंदा पाऊस चांगला बरसत असल्याने शेतकरी आनंदित झाला आहे कोरोना, चक्रिवादळा सारख्या संकटाना समोरे जाऊन दु:ख विसरुंन शेतकरी भातशेतीच्या कामात मग्न झाला आहे. हिच तर कोकणी माणसाची खासियत आहे याची प्रचिती पुन्हा एकदा आली आहे.

Comments