उरण शहरात पहिल्याच पावसात कमरेभर पाणी रस्त्यावर
घन:श्याम कडू
उरण : कालपासून पावसाला सुरुवात झाली. आज मात्र उरण शहरात पाण्याचा निचरा न झाल्याने पेन्शनर पार्क येथे पहिल्याच पावसात कमरेभर पाणी रस्त्यावर साचले होते. त्यातून वाट काढत जनतेला ये-जा करावी लागत होती.
गेला महिनाभर पावसाची वाट पहात असताना काल पासून पावसाने सुरुवात केली. परंतु शहरातील नालेसफाईची कामे व्यवस्थित न झाल्याने व काँक्रीटीकरण रस्त्यांची उंची वाढल्याने पावसाचे पाणी साचत होते. पहिल्याच पडणाऱ्या पावसामुळे पाण्याचा निचरा व्यवस्थित न झाल्यामुळे शहरातील अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणीच पाणी झाले होते. परिस्थिती अशीच राहिली तर अजून पूर्ण पावसाळा जाईपर्यंत हालत आणखीन बिघडेल अशी चर्चा नागरिकांत सुरू होती.
पेन्शनर पार्क येथे काँक्रीटीकरण केल्यामुळे रस्त्याची उंची वाढली आहे. तसेच नाले सफाई व्यवस्थित न झाल्याने इंदिरा ग्रामीण रुग्णालयाजवळील रस्त्यावर कमरेभर पाणी साचले होते. यामुळे दवाखान्यात व रस्त्यावर ये-जा करणाऱ्यांना त्यातून वाट काढत जावे लागत होते. तसेच पावसाचे पाणी या भागातील काही रहिवाशांच्या घरात घुसले. त्यानी मशीनद्वारे पाणी घराबाहेर काढले. मात्र जर रात्रीच्यावेळी पाणी घरांत घुसले तर परिस्थिती गंभीर होऊ शकते. यावरून उरण नगरपालिकेचा नाकर्तेपणा दिसून येत आहे.
या परिसरात दरवर्षी पावसाळ्यात पाणी रस्त्यावर पाणीच पाणी होऊन घरांमध्ये जात असतानाही त्यावर ठोस उपाययोजना करण्याबाबत नगरपालिका उदासीन असल्यामुळे या परिसरात नाराजीचा सूर निघत आहे.
Comments
Post a Comment