नुसते चायनाचे अँप बंद करून काय उपयोग?
चायनावरून जेएनपीटी बंदरात येणाऱ्या व्हेसल्स कधी होणार बंद? - जनतेचा सवाल
अनंत नारंगीकर
जेएनपीटी : भारत-चीन दरम्यान गलवान खोऱ्यात तणावाची स्थिती आहे. त्यातूनच चीनच्या मोबाईल अँपवर बंदी घालण्याचा निर्णय सरकारने नुकताच घेतला आहे. त्यातून भक्तांनी अनेक सोशल मिडीयावार सरकारची वाहवा देखील केलेली असतानाच आता फेसबुक सारख्या सोशल मीडियावर फोटो अपलोड करत अरे चायनाला धडा शिकवायचा असेल तर नुसते अँप बंद करून काय उपयोग चायनावरून भारतात येणारी व्यापारी जहाजे (कंटेनर व्हेसल्स ) कधी बंद करणार असा सवाल करीत नेटिझियन्सनी सोशल मीडियावर उरणच्या भारत मुंबई कंटेनर टर्मिनलमध्ये बर्थ झालेल्या चायना शिपिंग लाईनच्या एका आजच्या व्हेसल्सचा फोटोही शेअर केला आहे. त्यावर अनेक नेटिझियन्सनी आपल्या प्रतिक्रिया देताना सरकारच्या दुटप्पी धोरणावर सडकून टीका केल्याचे दिसून येत आहे.
संपूर्ण जगाला कोरोनाच्या खाईत लोटणारा देश म्हणून चीनवर सध्या जगभरातून टीका होत आहे. त्यातच भारताच्या सीमेवर चिनी सैनिकांनी गलवान खोऱ्यामध्ये केलेल्या हरकतींमुळे भारतीयांमध्ये चीनबद्दल कमालीचा संताप आहे. चिनी सैनिकांनी कपटाने आपल्या सैनिकांना मारल्याचाही संताप नागरिकांमध्ये आहे. याच पार्श्वभूमीवर भारत सरकारने ५९ चिनी अँप बंद करण्याचा निर्णय घेतला. त्या निर्णयाचे जोरदार स्वागत भारतीय नागरिकांनी केले. राज्य आणि केंद्र सरकारने अनेक चिनी कंपन्यांसोबतचे करारही रद्द केल्याच्या घटना घडल्या आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर ज्या चीनशी काही संबंधच ठेवायचा नाही त्यांच्यासोबत व्यापार उद्योग तरी हवा कशाला असा सवाल विचारला जात असून त्यानिमित्ताने आजच उरणच्या जेएनपीटी बंदरातील भारत मुंबई कंटेनर टर्मिनल येथे बर्थ झालेल्या चायना शिपिंग लाईन नावाच्या जहाजाचा फोटोही सोशल मीडियावर प्रसारित करीत नेटिझियन्सनी प्रश्नांची सरबत्ती केली आहे. गणेश तांडेल नामक व्यक्तीने टाकलेल्या या पोष्टवर सध्या मोठ्या प्रमाणात प्रतिक्रियांचा पाऊस पडल्याचे पाहायला मिळत आहे.
ADVT
Comments
Post a Comment