एक महिन्यापासून हुर्डी ग्रामस्थ पिण्याच्या पाण्यापासून वंचित

एक महिन्यापासून हुर्डी ग्रामस्थ पिण्याच्या पाण्यापासून वंचित


सलीम शेख
           माणगाव : तालुक्यातील गोरेगाव नजीकच्या हुर्डी गावात एक महिन्याच्या कालावधीनंतरही वीजपुरवठा सुरळीत झाला नसल्याने ग्रामस्थांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. विजेचा अक्षरशः लपंडाव चालू आहे. वीजेअभावी पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली असून अनेक छोट्या -मोठ्या व्यवसांयावरही परिणाम झाला आहे. आधीच लाँकडाऊनमुळे आर्थिक अडचणीत असलेल्या नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये, अशी संतप्त प्रतिक्रिया  हुर्डी ग्रामस्थांकडून व्यक्त होत    आहे.
         
            ३ जुन रोजी आलेल्या निसर्ग चक्रीवादळात माणगाव तालुक्यात अनेक ठिकाणी महावितरण कंपनीचे विजेचे खांब सोबत विद्युत ट्रान्सफॉर्मर जे पिण्याच्या पाण्याच्या पंपासाठी वापरात येतात ते जमीनदोस्त झाले आहेत. त्यामुळे विद्युतपुरवठा खंडित झाला होता. वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी महावितरण विभागाकडून बाहेरील जिल्ह्यातून कामगारांना पाचारण करण्यात आले. तब्बल १२ दिवसानंतर हुर्डी गावात वीज आली मात्र ट्रान्सफॉर्मर अद्याप लावला नसल्यामुळे विजेचा लपंडाव चालू आहे. हळूहळू वीजपुरवठा पूर्ववत होईल ह्या भाबड्या आशेवर ग्रामस्थ आहेत.
         या  विषया संदर्भात ग्रामस्थांनी दोन वेळा लेखी तक्रार दिली तसेच महावितरण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची गावच्या पदाधिकाऱ्यांनी प्रत्यक्षात भेट घेतली असता, तोंडी आश्वासन दिले असे गावचे अध्यक्ष नयन धाडवे, दिलीप आंबोणकर,  मोतीराम आंबोणकर, विजय आंबोणकर यांनी सांगितले. तरी महावितरण विभागाने लवकरात लवकर गावच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यासाठी  ट्रान्सफॉर्मर उभारून वीजपुरवठा पूर्ववत करावा अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.

Comments