माथेरान नगरपरिषदेत स्वीकृत नगरसेवक आणि उप नगराध्यक्षपदावर वर्णी कुणाची?
मुकुंद रांजाणे
माथेरान : येथील नगरपरिषदेत सन २०१६ मध्ये शिवसेनेने स्वबळावर एकहाती सत्ता स्थापन केली होती. त्यावेळी एकूण १४ सदस्य जनतेमधून निवडून आले होते तर शिवसेनेच्या दोन कार्यकर्त्यांना अडीच-अडीच वर्षांसाठी स्वीकृत सदस्य पद देण्यात आले होते. २०१६ च्या त्या निवडणुकीवेळी शेतकरी कामगार पक्षासह, आरपीआय यांनी सुध्दा बिनशर्त पाठिंबा जाहीर केला होता त्यावेळी शेतकरी कामगार पक्ष आणि आरपीआयच्या प्रमुखांना पुढील काळात अडीच वर्षे स्वीकृत सदस्य पद देण्याबाबत आश्वासन देण्यात आले होते. सुरुवातीच्या काळात या पदावर सर्व शासकीय प्रक्रिया पूर्ण करून चंद्रकांत जाधव आणि ऋतुजा प्रधान यांची अडीच वर्षासाठी नियुक्ती करण्यात आली होती. तर उप नगराध्यक्षपद आकाश चौधरी यांना दिले होते. हे पद सुध्दा त्याचप्रमाणे अडीच वर्षांसाठी विभागून देण्याचे ठरले होते. परंतु पक्षातील अंतर्गत मतभेद आणि सुरुवातीपासून जुन्या नव्याचा वाद आतल्या गोटातुन धुमसत होता, त्यामुळे अडीच वर्षांचा कालावधी उलटून गेला तरीसुद्धा स्वीकृत आणि उपनगराध्यक्ष ह्या पदांचा संबंधित पदाधिकाऱ्यांकडून राजीनामा देण्यात आला नव्हता. याला जबाबदार सुद्धा अंतर्गत मतभेद आहेत.
त्यातच पक्ष कार्यकारिणीमध्ये बदल घडवून आणण्यासाठी नेहमीच प्रयत्न केले जात होते. आपापसातील वाद चव्हाट्यावर येऊ नये यासाठी पक्षाच्या वरिष्ठांसोबत याबाबत दि. १ जुलै रोजी कर्जत-खालापूरचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या निवासस्थानी बैठक घेण्यात आली होती. त्यावेळेस स्वीकृत नगरसेवक चंद्रकांत जाधव यांनी तडकाफडकी आपल्या पदाचा राजीनामा वरिष्ठांना सुपूर्द केला होता. उर्वरित एक स्वीकृत पद आणि उप नगराध्यक्ष यांचे राजीनामे लवकरच सादर होणे अपेक्षित होते परंतु आठ दिवस झाले तरीसुद्धा याबाबतीत काही चित्र स्पष्ट झालेले दिसत नाही. अडीच वर्षानंतर सुरुवातीला शेतकरी कामगार पक्षाचे शफीक शेख यांना स्वीकृत सदस्य पद देण्याबाबत ठरल्याचे समजते तर उप नगराध्यक्ष पदासाठी सुध्दा अनेक जण इच्छुक दिसत आहेत. परंतु राजीनामा नाट्य केव्हा संपुष्टात येईल आणि या पदांवर कुणाकुणाची वर्णी लागणार आहे याबाबत सध्या गावात अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.
--------------------------------------------------------------------------------
२०१६च्या निवडणूकी वेळी आम्ही शिवसेनेला जाहीर पाठींबा दिला होता त्यावेळेस शहर प्रमुख चंद्रकांत चौधरी यांनी सत्ता स्थापन झाल्यावर पुढची अडीच वर्षे स्वीकृत सदस्य म्हणून माझी नियुक्ती करणार असे आश्वासन दिले होते.परंतु आता साडेतीन वर्षे लोटली आहेत.स्वीकृत सदस्य चंद्रकांत जाधव यांनी आपल्या पदाचा नुकताच राजीनामा दिला आहे त्यामुळे या रिक्त जागेवर मला दिलेल्या आश्वासनाप्रमाणे हे पद मला लवकरात लवकर देणे क्रमप्राप्त आहे.
- शफीक शेख
अध्यक्ष शेतकरी कामगार पक्ष,माथेरान
--------------------------------------------------------------------------------
शिवसेना पक्षात शब्दाला फार मोठे महत्व आहे त्यामुळे उपनगराध्यक्ष पद व दोन स्वीकृत सदस्य पदांच्या निवडीच्या प्रक्रियेला थोडा विलंब झाला असला तरी 1जुलै 2020 रोजी कर्जत तालुका पदाधिका-यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत शहरप्रमुख चंद्रकांत चौधरी यांच्या आदेशानुसार माझ्या स्वेच्छेने मी माझ्या स्वीकृत नगरसेवकपदाचा राजीनामा जिल्हाप्रमुख मनोहर भोईर यांच्याकडे सादर केलेला आहे मीटिंग होऊन आज सहा दिवस उलटूनही ह्या निवडीच्या प्रक्रियेला विलंब होत आहे अपेक्षा करतो की बाकी सदस्यांनी सुद्धा लवकरात लवकर आपले राजीनामे सादर करावेत .जेणेकरून सर्वांना संधी मिळेल .
- चंद्रकांत जाधव
माजी स्वीकृत सदस्य, माथेरान नगरपरिषद
--------------------------------------------------------------------------------
मान्यवरांच्या उपस्थितीत सर्व पदाधिकारी नगरसेवक ,शहर प्रमुख यांची कर्जत येथे आमदार महेंद्र थोरवे यांच्या निवासस्थानी बैठक झाली होती त्यावेळी माथेरान शिवसेनेच्या अंतर्गत वादावर अखेर पडदा पडला व दोन गटातील वाद मिटला. त्यानंतर आमदार व जिल्हा प्रमुख यांनी आम्ही दिलेला शब्द तुम्हाला मानलाच पाहिजे असे खडे बोल सुनावले व आम्हाला अडीच वर्षकरिता देऊ केलेले उपनगराध्यक्ष हे पद हे प्रतिभा घावरे यांनाच सर्वांचे समोर देऊ केले आहे. दिलेला शब्द उशिरा का होईना पण आम्हाला लवकरच न्याय मिळणार त्याबद्दल मी सर्व पदाधिकारी नगरसेवक तसेच महिला आघाडी व आमदार जिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख सल्लागार जिल्हा महिला संघटक यांचे खूपखूप आभारी आहे.
- प्रदीप घावरे
माजी नगरसेवक माथेरान
--------------------------------------------------------------------------------
Comments
Post a Comment