म्हसळा तालुक्यात ४४ गावे अजूनही अंधारातच

म्हसळा तालुक्यात ४४ गावे अजूनही अंधारातच


जितेंद्र नटे
         म्हसळा : ३ जून २०२० ला गेलेली वीज अजूनही आलीच नाही. शहर वासियांना वीज पुरवठा आणि गाववाल्यानी वाट बघा? अशी अवस्था सध्या म्हसळ्यात आहे. तातडीने समस्या सोडविणारे नेते मंडळी अजून नुकसानग्रस्तांना मदत मिळवून देऊ शकले नाहीत? या सारखे दुर्दैव नाही. सत्ताधारी आणि विरोधी आले आणि भेट देऊन गेले. सगळ्यांना वाटले भरपूर मदत मिळेल, लवकर वीज येईल. मात्र भ्रमनीरास झाला. लोक गप्प बसली आणि फसली. थंड आहेत म्हसळावाले ते काय करणार? त्यामुळे नेते मंडळी यांना जास्त विचारत घेत नाहीत.
          कुणीही वाली नाही अशी अवस्था श्रीवर्धन मतदार संघाची झाली आहे. म्हसळा तालुक्यातील एमएससीबी अधिकारी वानखेडे यांच्याशी प्रस्तुत प्रतिनिधीने संपर्क साधला असता त्यांनी सांगितलेली कि परिस्थितीत भयानक आहे. १३ कंत्राटदारांना काम दिले आहे, मात्र हे कंत्राटदार काम वेगात करीत नाहीत. कोकणातील झाडे-झुडपे आणि डोंगर भागात काम करण्याची त्यांना सवय नाही, असे ते सांगतात. काही ठिकाणी मशीन पोचत नाहीत. तर काही एजंट काम टाकून गेले. एकूण १३० कर्मचारी काम करीत आहेत. अजून मॅनपॉवर पाहिजे आहे. अश्या अनेक समस्या आहेत. आपले कर्मचारी पावसात भिजतही काम करीत असल्याची व्यथा त्यांनी व्यक्त केली. पुढील १५ दिवसात पास्ती-मोरवने या विभागातील ११ गावे वीज पुरवठा पूर्ववत होईल. तर वाडाम्बा, सकलप कोंड ते सांगवड या विभागातील १० गावे २ ते ६ दिवसात सुरु होतील. एकूण ८४ गावे आहेत त्यापैकी ४० गावातील वीज सुरु झाली असून अजून ४४ गावे अजूनही अंधारातच आहेत. मनुष्यबळ कमी आल्यामुळे ग्रामस्थ मंडळीची मदत घेऊन काम करीत असल्याचे चित्र सध्या दिसत आहेत. म्हणजे स्थानिक नेते मंडळी पावसाळा सुरु असल्यामुळे अंगावर गोधडी घेऊन झोपले आहेत कि काय? नेते मंडळी आता का फिरत नाहीत मदत करायला हा राग सध्या म्हसळ्याची ग्रामीण जनता व्यक्त करीत आहेत. शहरात दुकानदाराला खुश करण्यासाठी लवकर वीज सुरु केली आणि ग्रामीण विभागाकडे दुर्लक्ष केले हे अत्यंत दुर्दैवी असून इलेक्शन येऊ द्या तर खरे मग दाखवू यांना आमची ताकद अशी घुसमट सध्या गाववाले व्यक्त करीत आहेत. 

Comments