रोह्यात रक्तपेढीची नितांत गरज

रोह्यात रक्तपेढीची नितांत गरज

सर्वपक्षीय आमदार व लोकप्रतिनिधिंनी लक्ष देण्याची स्थानिकांची आग्रही मागणी


वार्ताहर

            रोहा : रायगड जिल्ह्यातील महत्वाचा तालुका असा लौकिक असलेल्या रोहा तालुक्यात आरोग्य व्यवस्थाच व्हेंटिलेटर वर असल्याचे कोरोनाकाळात आधिक प्रकर्षाने जाणवत असतानाच रोह्यात रक्तपेढीची असलेली नितांत गरज पुन्हा एकदा आधोरेखित झाली आहे.रोहा उपजिल्हा रुग्णालयात ही व्यवस्था सुरू व्हावी यासाठी तालुक्यातील सर्व पक्षीय आमदार, लोकप्रतिनिधी, सर्वपक्षीय नेतेगण यांनी प्रयत्न करुन शक्य तेवढ्या लवकर रोह्यात रक्तपेढी सुरू करावी अशी मागणी नागरिकांच्यात जोर धरू लागली आहे.

            नुकताच रोहे तालुक्यातील एका महिलेचा प्रसुतीदरम्यान अतिरक्तस्त्राव होऊन दुर्दैवी म्रुत्यु झाला, तिला वेळेवर रक्त उपलब्ध झाले असते तर कदाचित तिचा जीव वाचू शकला असता मात्र रोह्यासारख्या महत्वाच्या व मोठ्या तालुक्यात रक्तपेढी नसल्याने रुग्णांची हेळसांड होत असून प्रसंगी रुग्णांना जीव गमवावा लागत आहे या आधीही अशा अप्रिय घटना घडलेल्या असून किमान आता तरी शासन व प्रशासनाने खडबडून जागे होण्याची गरज आहे.

मार्चपासून कोरोनाकाळात रोह्यातील आरोग्य व्यवस्था किती सक्षम आहे याची यथोचित प्रचिती गावकऱ्यांना आलेली आहे. तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालय व खाजगी रुग्णालयात देखील व्हेंटिलेटर सुविधा उपलब्ध नसल्याने नाइलाजास्तव अनेक कोरोनाबाधित रुग्णांना त्यांची आर्थिक क्षमता नसतांनाही मुंबई, पुणे येथील रुग्णालयात दाखल होऊन उपचार घ्यावे लागले रोह्यातच जर व्हेंटिलेटर सुविधा उपलब्ध असती तर हि वेळ त्यांच्यावर आली नसती.

रोह्यात रक्तपेढीची आवश्यकता आहे या विषयी अनेकदा सामाजिक व राजकीय व्यासपिठावरून चर्चा झाली आहे, एखादी अप्रिय घटना घडली कि दोन-चार दिवस यासंबंधी बोलले जाते त्यानंतर मात्र ये रे माझ्या मागल्या या उक्तीप्रमाणे सर्व राजकारणी सोयीस्करपणे हा विषय विसरतात आता मात्र या विषयी रोह्यातील सर्व आमदार, लोकप्रतिनिधिंनी एकत्र येऊन ठोस पावले उचलणे गरजेचे आहे.

           रोहे तालुक्याला पाच आमदारांचे वरदान लाभले असून यात सर्वपक्षीय आमदारांचा समावेश आहे, मतांचे दान देतांना रोहे तालुक्याने सर्वच पक्षांना झुकते माप दिले असल्याने आता रोहेकरांच्या पारड्यात चांगल्या आरोग्यसेवेचे दान टाकणे ही या सर्वपक्षीय आमदारांची जबाबदारी आहे यासाठी त्यांनी एकत्र येऊन पुढाकार घेतला पाहिजे, सर्व आमदारांनी एकत्रित प्रयत्न केल्यास तालुक्याला एक सुसज्ज रुग्णालय व एक रक्तपेढी देणे ही काय मोठी गोष्ट नाही अशी येथील जनतेची भावना आहे.

           रोह्याचा पंचतारांकित विकास होईल तेव्हा होईल, रोहा स्मार्ट सिटी होईल तेव्हा होईल सद्य परिस्थितीत लोकांचे जगणे सुरक्षित होण्यासाठी रोह्यात चांगल्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजेत ही येथील लोकांची प्राधान्याने असलेली मागणी आहे.

येणाऱ्या काळात रोह्यातील आरोग्यव्यवस्था सुधारण्यासाठी आधिक निधी खर्च करण्याची गरज असून रोह्यातील रक्तपेढीचा अनेक वर्ष प्रलंबित असलेला विषय तातडीने मार्गी लावण्याची गरज आहे.

Comments