डॉक्टरांनी वेठीस धरल्याने नवजात बालकाच्या वडिलांचा आत्महत्येचा विचार!
कांतीलाल कडू यांनी शिकविला डॉक्टरांना धडा
प्रतिनिधी
कामोठे : बाळ जन्माला आलं आणि डॉक्टरांनी सिझरचे 78 हजाराचे बिल सांगितले. घरात अठराविश्व दारिद्रय... पायताण तुटेपर्यंत पायाला भिंगरी बांधून बाप धावला... हात पसरले... कसेबसे पन्नास हजार जमवले आणि डॉक्टरांच्या झोळीत ओतले... परंतु पूर्ण पैसे दिले नाही तर बाळ मिळणार नाही, असे डॉक्टरांनी धमकावल्याने बापाने पराभव पत्करला. मनात आत्महत्येचा विचार घोळू लागला. मात्र, सामाजिक कार्यकर्ते कांतीलाल कडू यांनी मुजोर डॉक्टर रूपेश वडगावकर यांना चांगलाच धडा शिकवून त्यांच्या नजरकैदेत असलेल्या आई आणि बाळाची सुखरूप सुटका केली.
रोहिंजन परिसरातील पिसार्वे गावातील गर्भवती मातेला बाळंतपणासाठी कामोठे येथील डॉ. रूपेश वडगावकर यांच्या साई समर्थ हॉस्पिटलमध्ये दाखल केले. काही वेळात तिचे सिझर झाले. संध्याकाळी डॉक्टरांनी 78 हजारांचे बिल देवून टाकले. बाळाला नवजात शिशु विभागात ठेवले होते. पंधराशे रूपये महिन्याला देवून भाड्याच्या घरात राहणाऱ्या बापाच्या, डॉक्टरांच्या बिलाचा आकडा पाहून दिवसा डोळ्यासमोर तारे चमकले. त्याने दिवसभर उपाशीपोटी अनेकांकडे मदतीसाठी याचना केली. जमा केलेली पन्नास हजारांची पुंजी डॉक्टरांच्या झोळीत ओतली. ओक्साबोक्शी रडला बाप... डॉक्टरांच्या पायावर डोकं ठेवून याचना करून इतक्याच पैशात भागवून घ्या, मला माफ करा म्हणून विनवू लागला, परंतु डॉक्टरांना पाझर फुटेना. मग त्यांनी ओळखीच्या व्यक्तींकडून कामोठ्यातील काही सामाजिक कार्यकर्त्यांना सांगून डॉक्टरांची समजूत काढली. दोन दिवस झाले डॉक्टर कुणाची डाळ शिजू देईनात... बाप हतबल झाला... आई बाळाच्या चिंतेने व्याकुळ झाली... डॉक्टर वसुलीची शस्त्रे उगारून बसल्याने बापाने अखेर आत्महत्या करण्याचा विचार बोलून दाखविला, त्यांच्या नातेवाईकांकडे...एका क्षणात सगळ्यांच्या काळजाचा ठोका चुकला. नातेवाईकांनी पुन्हा काही मार्ग निघतो का पाहण्यासाठी प्रयत्न केला. खारघर येथील त्यांचा मित्र दीपक कांबळे यांना त्यांनी फोन करून डॉक्टरांचे प्रताप आणि मुलाच्या वडिलांची मानसिक स्थिती सांगितली. त्यांनी कळंबोलीतील नातेवाईक पत्रकार विकास पाटील यांना फोन केला. पाटील यांनी सामाजिक कार्यकर्ते कांतीलाल कडू यांना तातडीने फोन करण्यास सांगितले. विकास पाटील यांनीही फोन करून मदत करण्यास सांगितले.
दीपक कांबळे डॉक्टरांशी कांतीलाल कडू यांच्याशी बोलणे करून देण्यासाठी त्यांच्या केबिनबाहेर तीन तास ताटकळत राहिले. इतर कर्मचाऱ्यांनी त्यांना उडवून लावले. त्यानंतर डॉक्टर आले. दीपक, त्याचा भाऊ, मुलाच्या वडिलांबरोबर हुज्जत घातली. दीपकने कांतीलाल कडू यांच्याशी एकदा बोलून घ्या अशी विनंती केली. डॉक्टरांनी फोन हिसकावून फेकून दिला. शब्दाला शब्द भिडत होते. डॉक्टर एखाद्या टोळीतील सराईतासारखे तुटून पडले होते. प्रकरण वाढते आहे म्हटल्यावर त्यांनी दीपकला मावशीवर हात का उचलला असा कांगावा केला पण दीपकने चाणाक्षपणे हाणून पाडला आणि सांगितले की, तुमच्याकडे सीसीटीव्ही आहे त्यात बघा... असे म्हटल्यावर डॉक्टर रूपेश वडगावकर तोंडावर आपटले. ही गडबड सुरू असताना दीपकने कांतीलाल कडू यांना फोन लावला होता. तेथील तापलेले वातावरण आणि डॉक्टर समजून घेण्याच्या मनस्थितीत नसल्याने कडू यांनी दीपकला पोलिस ठाण्यात जाण्याचा सल्ला दिला. तर डॉक्टरांनी आधिच पोलिसांना पाचारण केले आहे, असे सांगितले. मग कडू यांनी तातडीने त्यांना पोलिस ठाण्यात पाठविले. फोन करून पोलिसांना घटना सांगितली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय पाटील यांच्या कानावर हकिगत टाकली. इकडे डॉ. रूपेश यांनी कडू यांना फोन करून उलट्या बोंबा मारायला सुरुवात केली.. पोलिसांत कशाला पाठविले? तुम्ही एकच बाजू घेता? ते पैसे भरल्याशिवाय बाळ देणार नाही असे विषारी फुत्कारही काढले. पोलिसांना कळविल्यानंतरही डॉक्टरांनी बापाला आणखी दहा हजाराला लुटले. इतक्यात वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय पाटील यांनी डॉक्टरांना फोन करून समज दिल्यानंतर डॉक्टरांच्या अहंकाराचा फुगा फुटला... त्यांची चांगलीच जिरवली होती कडू यांनी. अशारितीने डॉक्टरांना धडा शिकवल्याने बाळाचे नातेवाईक, दीपक कांबळे, विकास पाटील यांनी आभार मानले. त्यानंतर बाळाला तेथून काढून एमजीएम हॉस्पिटलला पुढील उपचारांसाठी दाखल केले आहे.
Comments
Post a Comment