माथेरानच्या पर्यटनाला लवकरच मिळणार गती!

माथेरानच्या पर्यटनाला लवकरच मिळणार गती!


मुकुंद रांजाणे

         माथेरान : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनला जवळपास सात महिन्यांचा कालावधी पूर्ण होत आहे. केवळ पर्यटन शेतीवर अवलंबून असणाऱ्या इथल्या स्थानिक व्यावसायिक आणि ग्रामस्थाना या कठीण काळात अनेक समस्यांवर मात करून आपल्या कुटुंबाला आधार द्यावा लागला होता. २ सप्टेंबर रोजी माथेरान अनलॉक केल्यामुळे काहीशा प्रमाणात का होईना पर्यटकांनी हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे त्यामुळे इथल्या स्थानिकांसह तालुक्यातील जवळजवळ पंचवीस हजार लहान मोठे व्यावसायिक तसेच मोलमजूरी करणा-यांच जीवनमान हे खऱ्या अर्थाने याच पर्यटनस्थळावर अवलंबून आहे.त्यांच्याही हाताला माथेरान मध्येच भरपूर प्रमाणात रोजगार उपलब्ध होत आहे.

          लवकरच दिवाळी हंगाम येणार असल्याने मागील सात महिन्यांपासून लॉक डाऊन काळात घरात बसून राहिलेले माथेरान प्रेमी पर्यटक मोठया संख्येने इथे हजेरी लावण्याची शक्यता नाकारता येत नाही. सध्या कोरोनामुळे अनेकजण भयभीत झालेले आहेत. आणि ह्या आजाराला नव्हे तर या संकटाला सामोरे जाऊन त्यासोबत सर्वानाच आपापले व्यवसाय करावयाचे आहेत. शक्य तेवढी दक्षता घेतली तर काही कठीण नाही. काही प्रमाणात हॉटेल्स सुरू करण्यात आले आहेत त्यामुळे खर्चिक पर्यटकांनी तसेच विदेशातील पर्यटक सुध्दा येण्यास सुरुवात झाली आहे. लॉकडाऊन मध्ये सात महिने आपल्या मूळ व्यवसायाशिवाय दिवस कंठीत स्थानिकांना आलेल्या संकटाचा सामना करावा लागला होता. ती परिस्थिती लवकरच दूर होणार असून नोव्हेंबरमध्ये इथे पर्यटनाला खऱ्या अर्थाने सुरुवात होणार आहे. पर्यटकांना आनंद देणारी माथेरानची मिनिट्रेन लवकरच सुरू व्हावी यासाठी नगरपरिषदेचे गटनेते प्रसाद सावंत आपल्या परीने संबंधित अधिकारी वर्ग त्याचप्रमाणे माथेरानच्या आजवरच्या अनेक समस्या मार्गी लावण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असणारे मावळ मतदार संघाचे कार्यसम्राट खासदार श्रीरंग अप्पा बारणे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करत आहे. त्यामुळे आगामी काळात लवकरच नेरळ माथेरान मिनिट्रेन आणि अमन लॉज ते माथेरान दरम्यान शटल सेवा पर्यटकांच्या दिमतीला धावणार आहे.

          माथेरानचे प्रवेशद्वार असलेल्या दस्तुरी नाक्यावर येणाऱ्या पर्यटकांना गावात येण्यासाठी नेहमीच तेथील व्यावसायिकांकडून होणाऱ्या दिशाभूल, फसवणूक अशाप्रकारच्या नाहक त्रासामुळे पर्यटकांमधून नाराजीचा सूर निघत असतो त्यासाठी पोलीस प्रशासनाने दोन पोलीस कायमस्वरूपी बंदोबस्त करिता ठेवणे आवश्यक आहे. तर नगरपरिषदेने सुध्दा याबाबत पर्यटन वाढीसाठी येणाऱ्या पर्यटकांना सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आणि त्यांचा माथेरान अंतर्गत प्रवास सुखकर होण्यासाठी आपल्या परीने ठोस पावले उचलणे गरजेचे बनले आहे.असे बोलले जात आहे.


Comments