माणगाव तालुक्यातील कोस्ते बुद्रुक येथील जेटीएल कंपनीचा जीआय प्लांट बंद कधी होणार?

 कोस्ते बुद्रुक येथील जेटीएल कंपनीचा जीआय प्लांट बंद कधी होणार?

खासदार, पालकमंत्री, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या आदेशाला कंपनीने दाखवली केराची टोपली

संग्रहित 

सलीम शेख

        माणगाव : तालुक्यातील निजामपुर ग्रुप ग्रामपंचायत हद्दीत  कोस्ते बुद्रुक या ठिकाणी जेटीएल कंपनी गेली दीड वर्षापासून सुरू आहे. सदर कंपनीत साधे लोखंडी पाईप बनविले जात होते. कंपनीने गेल्या चार महिन्यांपासून रासायनिक केमिकल प्लांट सुरू केला आहे. कंपनीने दि. २२ ऑगस्ट रोजी रात्री सहा गावांची नळ पाणी पुरवठा करणाऱ्या जॅकवेलमध्ये मोठ्या प्रमाणात रसायन सोडल्यामुळे कोस्ते बुद्रुक गाव पिण्याच्या पाण्यापासून वंचित आहे. या गावाची लोकसंख्या सुमारे तीन हजारच्या आसपास आहे. सदरचे पाणी केमिकल युक्त असल्यामुळे चुलीवर ठेवल्यावर पाण्याला फेस येतो. हे अत्यंत विषारी केमिकल असावे असे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे. खासदार सुनील तटकरे, पालकमंत्री आदिती तटकरे, प्रांताधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांनी प्लांट बंद करण्याचे आदेश देऊनही कंपनीने प्लांट बंद केला नाही. त्यामुळे हा प्लांट बंद होणार कधी? असा प्रश्न निजामपूर सरपंच राजाभाऊ रणपिसे यांनी  उपस्थित केला आहे. 

      कोस्ते बुद्रुक येथील ग्रामस्थांनी सरपंच राजाभाऊ रणपिसे यांच्याकडे तक्रार केली असता निजामपूर ग्रामपंचायतीने पाहणी करून सदर कंपनीने नदीत रासायनिक युक्त पाणी सोडल्यामुळे या कंपनीला ग्रामपंचायतीने दिनांक २४ व २५ ऑगस्ट २०२० रोजी नोटीस देऊन देखील कंपनीने प्लांट बंद केला नाही. त्यामुळे खासदार सुनील तटकरे व पालकमंत्री आदिती तटकरे यांच्याकडे तक्रार केल्यावर त्यांनी त्वरित अधिकाऱ्यांची मीटिंग घेऊन प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी सरपंच, ग्रामसेवक यांना बरोबर घेऊन दिनांक १७ सप्टेंबर २०२० रोजी पाहणी केली असता कंपनीने उत्पादक प्रक्रियेतील रासायनिक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत बंद करण्याचे आदेश दिले. पाहणी अहवालावर कंपनीचे मॅनेजर अशिष शर्मा, सरपंच राजाभाऊ रणपिसे, ग्रामसेवक विशाल पाटणे, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (महाड) उपप्रादेशिक अधिकारी सागर औटी यांच्या स्वाक्षऱ्या झाल्या आहेत. असे असताना देखील कंपनीने फक्त 2 दिवस कंपनी बंद ठेवून दिनांक २१ सप्टेंबरपासून ग्रामपंचायत तसेच प्रदूषण मंडळ यांची कोणतीही परवानगी नसताना कंपनीने बेकायदेशीरपणे पुन्हा जीआय प्लांट सुरू केला आहे व रसायन काळ नदीत सोडले आहे.

       ग्रामपंचायतीने पुन्हा पाहणी करून प्लांट बंद करण्याचे आदेश दिले होते. परंतु कंपनी  बेजबाबदारपणे जीआय प्लांट सुरू करून लोकांच्या आरोग्याशी खेळत आहे. त्यामुळे मोठी जीवितहानी होण्याची शक्यता आहे. सरपंच राजाभाऊ रणपिसे यांनी पुन्हा खासदार सुनील तटकरे यांची भेट घेऊन दिनांक २८ सप्टेंबर रोजी उपविभागीय अधिकारी व प्रदूषण मंडळाचे अधिकारी यांची उपविभागीय अधिकारी यांच्या दालनात मीटिंग घेऊन संबंधितांवर योग्य ती कारवाई करावी असे आदेश खासदार सुनील तटकरे यांनी दिले. 

         कंपनी प्रदूषण मंडळाचे आदेश किती दिवस पाळणार हे पाहणे गरजेचे आहे. कंपनीने जीआय प्लांट बंद न केल्यास सदर कंपनीच्या विरोधात योग्य ती कारवाई करण्यात येईल असे सरपंच रणपिसे यांनी सांगितले. कंपनीला खासदार सुनील तटकरे, पालकमंत्री आदिती तटकरे, उपविभागीय अधिकारी माणगाव, प्रदूषण मंडळाचे अधिकारी यांनी आदेश देऊनही ही कंपनी ग्रामस्थांच्या पिण्याच्या पाण्याशी खेळखंडोबा करीत आहे.

Comments