शासनाच्या प्रचलित नियमांचे पालन करुन होणार भाटे वाचनालयाचा शारदोत्सव
१८ ऑक्टोबर रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन
वार्ताहर
रोहा : रोह्याची साहित्य पंढरी असलेल्या व शतकोत्तर यशस्वी वाटचाल करणाऱ्या भाटे सार्वजनिक वाचनालयाचा शारदोत्सव या वर्षी शासनाचे कोव्हिड संबंधीचे सर्व नियम, अटी, शर्थीचे यथोचित पालन करुन साजरा करण्यात येणार असल्याची माहिती भाटे सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष श्री. किशोर रविंद्र तावडे यांनी दिली.
भाटे सार्वजनिक वाचनालयाला दैदिप्यमान गौरवशाली परंपरा लाभली असून रोह्याची मातृसंस्था म्हणून या संस्थेची ओळख आहे. भाटे वाचनालयाच्या शारदोत्सवाचे हे 35 वे वर्ष असून शारदोत्सवाच्या निमित्ताने भाटे सार्वजनिक वाचनालयात दरवर्षी नऊ दिवस अत्यंत मांगल्यपुर्ण वातावरणात शारदा पूजन व अन्य धार्मिक कार्यक्रम संपन्न होतात. या वेळी साहित्यिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची देखील रेलचेल असते.
यावर्षी मात्र कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून असलेल्या शासनाच्या सर्व प्रचलित नियमांच्या अधीन राहून हा उत्सव साजरा करण्याचा निर्णय भाटे सार्वजनिक वाचनालय संचालक मंडळाने घेतला आहे.
देशभरासह महाराष्ट्रात असलेला रक्ताचा तुटवडा लक्षात घेता भाटे सार्वजनिक वाचनालयातर्फे रविवार दिनांक 18 ऑक्टोबर रोजी सकाळी नऊ ते दुपारी चार या वेळेत जनकल्याण रक्तपेढि महाड यांच्या सौजन्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करुन एक आदर्श घालून दिला आहे. रोहेकरांनी या अडचणीच्या व गरजेच्या वेळी जास्तीत जास्त संख्येने रक्तदान करून या पुण्यकर्मात सहभागी व्हावे असे आवाहन वाचनालयाचे अध्यक्ष किशोर रविंद्र तावडे यांनी केले आहे.
रक्तदान शिबिराबरोबरच काही आरोग्यविषयक अन्य उपक्रमांचेही प्रचलित नियमांचे पालन करुन आयोजन केले जाणार आहे.
Comments
Post a Comment