विज बिल दुरुस्त न केल्यास आत्मदहन : किशोर म्हात्रेंचा इशारा
उर्जा मंत्री नितीन राऊत यांच्या बंगल्यासमोर अंगावर रॉकेल ओतुन करणार आत्मदहन
महेंद्र म्हात्रे
नागोठणे : कोरोनाच्या जागतिक महामारीमुळे सर्वसामान्य जनता मेटाकुटीस आली असून त्यांना दोन वेळचे अन्न मिळणे देखील मुश्कील झाले आहे. त्यातच विज वितरण कंपनीकडून अव्वाच्या सव्वा विज बिल आकारणी केली जात असल्यामुळे सर्वसामन्य जनता बेजार झाली आहे. विज वितरण कंपनीने विज बिल योग्य पद्धतीने दुरुस्त करून न दिल्यास मंगळवार दि.१७ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र राज्याचे उर्जा मंत्री नितीन राऊत यांच्या मुंबई येथील पर्णकुटी बंगल्या समोर अंगावर रॉकेल ओतुन आत्मदहन करणार असा इशारा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलेल्या निवेदनात भाजपचे माजी जिल्हा उपाध्यक्ष किशोरभाई म्हात्रे यांनी दिला आहे.
आपल्या निवेदनात किशोरभाई म्हात्रे यांनी म्हटले आहे की, विज वितरण कंपनीने आपल्या ग्राहकाला सरासरी विज बिल दिले असून त्या बिलावरील व्याज तसेच शंभर युनिट पर्यंत प्रति युनिटला ३.४२ रुपये व शंभर युनिट वरील प्रति युनिटला ७.४६ रुपये विज बिल आकारात आहे. एखाद्या ग्राहकाचे प्रति महिना ५०० रुपये विज बिल येत असेल तर एप्रिल ते जून पर्यंतच्या ३ महिन्याचे विज बिल १५०० रुपये यायला पाहिजे होते परंतु ते बिल १० हजार ते १५ हजार रुपया पर्यंत आले आहे.
याबाबत भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी वेळोवेळी आवाज उठविला असून मी उपोषणाचा इशारा देखील दिला होता . परंतु उपोषणाच्या दिवशी पाली तहसिलदार व विज मंडळाचे पाली येथील उपअभियंता यांच्या बरोबर आमची चर्चा देखील झाली परंतु आश्वासना पलीकडे काहीही झाले नाही. दरम्यान सरासरी विज बिलामध्ये दुरुस्ती करणे, येणाऱ्या विज बिलावरील व्याज रद्द करणे व शंभर युनिटला जे दर आकारले जातात तेच दर शंभर युनिट वरील युनिटला आकारण्यात यावे या आमच्या सर्व मागण्या येत्या महिना भरात मान्य न झाल्यास आत्मदहन करणार असा इशारा भाजपचे माजी जिल्हा उपाध्यक्ष किशोरभाई म्हात्रे यांनी निवेदना मार्फत दिला आहे.
Comments
Post a Comment