रायगड जिल्हा राष्ट्रवादी युवती काँग्रेस अध्यक्षपदी अॅड. सायली दळवी
वार्ताहर
माणगाव : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष तथा देशाचे नेते शरद पवार यांचे जाज्वल्य विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहचवण्यासाठी विश्वास दाखवून प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष ना. जयंत पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या निमंत्रक खा. सुप्रिया सुळे यांच्या मान्यतेने रायगड जिल्हा राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या अध्यक्षपदी माणगाव तालुक्यातील मुठवली तर्फे तळे गावांतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्या अॅड. सायली संजय दळवी यांची नियुक्ती पक्षाच्या युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर यांनी नुकतीच प्रसिध्दी पत्रकाद्वारे जाहीर केली आहे. सदर नियुक्तीचे पत्र सोमवार दि. १९ ऑक्टोबर २०२० रोजी रायगड लोकसभा मतदार संघाचे खासदार सुनील तटकरे, रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे, आ. अनिकेत तटकरे यांच्या उपस्थितीत माणगाव येथे होणाऱ्या पक्षाच्या मेळाव्यात अॅड. सायली दळवी यांना देण्यात येणार आहे. अॅड. सायली दळवी यांची राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या रायगड जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याने त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
अॅड. सायली दळवी यांचे वडील संजय दळवी हे गेली अनेक वर्षांपासून इंदापूर विभागातील आपल्या मुठवली तर्फे तळे गावांत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काम निष्ठेने व प्रामाणिकपणे करीत आहेत. ते खासदार सुनील तटकरे यांचे कट्टर समर्थक असून त्यांची कन्या अँड. सायली दळवी यांनीही आपल्या उत्तम कर्तृत्वाच्या जोरावर आपल्या कार्याचा प्रभाव पक्ष नेतृत्वासमोर पाडला आहे. खा.सुनील तटकरे, पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या निवडणुकीत सायली दळवीने आपल्या बहारदार वक्तृत्वाने व्यासपीठ गाजवलेले आहे. तसेच मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे याकरिता मराठा समाज बांधवांकडून करण्यात येणाऱ्या आंदोलनात अॅड. दळवी यांनी आपल्या वक्तृत्वाचा प्रभाव जनतेसमोर पडला आहे. सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहणाऱ्या तसेच तरुणींना संघटित करून जिल्ह्यात भक्कमपणे राष्ट्रवादी युवती काँग्रेस उभी करून पक्षाची विचारधारा समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहचवेल या उद्देशाने त्यांना खा. सुनील तटकरे,पालकमंत्री आदिती तटकरे यांनी संधी दिली आहे. आपल्या नियुक्तीबद्दल प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया देताना अॅड. सायली दळवी यांनी सांगितले सर्वप्रथम मी आमचे नेते खा. सुनील तटकरे, पालकमंत्री आदिती तटकरे व आमदार अनिकेत तटकरे यांचे मनापासून ऋण व आभार व्यक्त करते. त्यांच्यामुळेच मला युवती राष्ट्रवादी काँग्रेसची जिल्हाध्यक्ष म्हणून नेतृत्व करण्याची संधी प्राप्त झाली आहे. या नेतेमंडळींचा विश्वास सार्थकी लावून मी रायगड जिल्ह्यात तरुणींसाठी विविध सामाजिक, शैक्षणिक उपक्रम राबवून युवतींना संघटित करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विचारधारा सर्वदूर पोहचवून पक्षाचे ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण हे धोरण नजरेसमोर ठेवून काम करणार असल्याचे सांगितले.
👌👌👏👏
ReplyDelete