आ. अनिकेत तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कोरोना हेल्प सेंटरचे उद्घाटन
वार्ताहर
रोहा : युवा आमदार अनिकेत तटकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी रोहा यांच्या सहकार्यातून रोह्यातील केतकी अपार्टमेंट या ठिकाणी राष्ट्रवादी जिल्हा कार्याध्यक्ष मधुकर पाटील यांच्या हस्ते फीत कापून कोविंड १९ कोरोना हेल्प सेंटरचे शुभारंभ आज करण्यात आले.
यावेळी रोह्याचे नगराध्यक्ष संतोष पोटफोडे, राष्ट्रवादी प्रदेश सरचिटणीस विजयराव मोरे, उपनगराध्यक्ष महेश कोल्हटकर, गटनेते महेंद्र दिवेकर, सभापती अहमद दर्जी, नगरसेविका गीता पडवळ, दिवेश जैन, माजी नगरसेवक जितेंद्र पडवळ, राष्ट्रवादी शहराध्यक्ष अमित उकडे, राष्ट्रवादी रोहा तालुका युवक अध्यक्ष किरण मोरे, श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघ उपाध्यक्ष सचिन चाळके, युवा उद्योजक रवींद्र चाळके, नीलेश शिर्के, चंद्रकांत पार्टे, विनित वाकडे, महेंद्र खैरे, मयूर पायगुडे, रियाज शेटे, प्रतिथयश व्यापारी विलास गुजर, प्रशांत बांदल, अमोल टेमकर आदी मान्यवर उपस्थित होते.
कोविड-१९ महामारीमुळे संपूर्ण मानवजातीवर परिणाम झाला आहे. त्याचा परिणाम रायगड जिल्ह्यासह रोहा तालुक्यात व शहरातही झाला आहे. शहरातील दिवसेंदिवस वाढती रुग्ण संख्या पाहता आरोग्य यंत्रणेवर त्याचा जादा भार पडत आहे. त्यातील रुग्णांना योग्य त्या उपचारासाठी सहज मदत व्हावी याकरिता कोविड १९ कोरोना हेल्प सेंटर रोहयात सुरू करण्यात आला आहे. यांच्या माध्यमातून या हेल्प सेंटरमधून कोरोना रुग्ण उपचारासाठी जिल्हा अंतर्गत किंवा जिल्हा बाहेर जावे लागत असल्यास रुग्णास रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यास या सेंटरमधून सहकार्य केले जाईल. गंभीर रुग्णास जादा प्राणवायूची गरज भासल्यास जिल्ह्यातील अथवा जिल्ह्याबाहेरील नामांकित रुग्णालयात बेड उपलब्ध करून देण्यास या सेंटरमधून सहकार्य केले जाईल. रुग्णाला मोफत उपचार कसे मिळतील यावर जादा भर दिला जाईल. खाजगी रुग्णालयातील आकारणी योग्य उपचारातील देयकामध्ये जास्तीत जास्त सूट मिळण्यासाठी या सेंटरमधून सहकार्य केले जाणार आहे. या कोविड १९ कोरोना हेल्प सेंटरमधून कोरोना रुग्णांना चांगल्या प्रकारे मदत होणार आहे.
Comments
Post a Comment