ना. आदिती तटकरे यांच्या हस्ते उपजिल्हा रुग्णालय रोहा येथील रक्तसाठा केंद्राचे उद्घाटन
वार्ताहर
रोहा : रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री तसेच श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघाच्या स्थानिक आमदार आदिती तटकरे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यातून मंजुरी मिळालेल्या उपजिल्हा रुग्णालय रोहे येथील रक्तसाठा केंद्राचे तसेच तिथे होत असलेल्या ऑक्सिजन टँकचे सोमवारी ना. आदिती तटकरे यांच्या शुभहस्ते उद्घाटन करण्यात आले.
यावेळी त्यांच्यासमवेत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष मधुकर पाटील, तालुका अध्यक्ष विनोद पाशिलकर, रोह्याचे नगराध्यक्ष संतोष पोटफोडे, प्रांताधिकारी डॉ. यशवंत माने, तहसीलदार कविता जाधव, बि. डी. ओ. अनिकेत पाटील,उपजिल्हा रुग्णालय रोहाच्या अधिष्ठाता डॉ. अंकिता खैरकर, उपनगराध्यक्ष महेश कोल्हटकर, गटनेते मयुर दिवेकर, ज्येष्ठ नगरसेवक अहमद दर्जी, श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघ उपाध्यक्ष सचिन चाळके, युवा पदाधिकारी मयुर पायगुडे, सागर भोबड, विनीत वाकडे आदी मान्यवर उपस्थित होते.
गेल्याच आठवड्यात रोह्यातील डॉक्टरांनी रायगडचे खासदार सुनिल तटकरे तसेच पालकमंत्री ना. आदिती तटकरेंची भेट घेवून रोह्यात रक्तपेढि अथवा रक्त साठा केंद्राची सुविधा उपलब्ध करुन देण्यासंबंधी विनंती केली होती अत्यंत संवेदनशिल मनाच्या पालकमंत्री ना. आदिती तटकरेंनी अत्यंत तत्परतेने ही समस्या मार्गी लावून तालुक्यातील नागरिकांना नवसंजीवनी देण्याचे मोठे काम केले.
या नवीन रक्तसाठा केंद्राचा आपत्कालीन परिस्थितीत रोह्यातील नागरिकांना चांगला उपयोग होणार असल्याची माहिती उपजिल्हा रुग्णालय रोहाच्या अधिष्ठाता डॉ. अंकिता खैरकर यांनी दिली व रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री ना. आदिती तटकरेंचे विशेष आभार व्यक्त केले. कोरोनाकाळात उपजिल्हा रुग्णालय रोहाच्या अधिष्ठाता डॉ. अंकिता खैरकर आणि टीमने रोहेकरांना दिलेल्या चांगल्या सेवेचे यावेळी ना.आदिती तटकरे यांनी विशेष कौतुक केले.
Comments
Post a Comment