माणगाव चांदोरे येथील ७५ वर्षीय वयोवृध्द इसम अचानक बेपत्ता
सलीम शेख
माणगाव : तालुक्यातील चांदोरे येथील ७५ वर्षीय वयोवृध्द इसम कुत्र्याला फिरायला घेवून जातो असे सांगून घराबाहेर पडून ते अचानक बेपत्ता झाल्याने चांदोरे गावांसह माणगाव तालुक्यात सर्वत्र खळबळ उडाली आहे.सदरची घटना २४ सप्टेंबर २०२० रोजी घडली असून याबाबत सदर बेपत्ता इसमाचा मुलगा अविनाश मोतीराम पाटील(वय- ३८) रा. चांदोरे, ता. माणगाव यांनी आपले वडील बेपत्ता झाल्याची तक्रार माणगाव पोलीस ठाण्यात दिली.
याबाबत माणगाव पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, मोतीराम महादेव पाटील (वय - ७५) रा. चांदोरे, ता.माणगाव हे २४ सप्टेंबर २०२० रोजी आपल्या घरातून कुत्र्याला बाहेर फिरायला घेवून जातो असे सांगत घराबाहेर पडले.यानंतर ते पुन्हा घरी आलेच नाहीत.त्यानंतर त्यांच्या नातेवाईकांनी आजूबाजूला व नातेवाईकांमध्ये शोध घेतला असता ते सापडले नसल्याने २५ सप्टेंबर २०२० रोजी त्यांचा मुलगा अविनाश पाटील यांनी आपले वडील बेपत्ता झाल्याची माणगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली. सदर बेपत्ता इसमाचे वर्णन रंग गहूवर्णीय ,बांधा मध्यम, उंची ५ फुट ३ इंच,चेहरा उभट, केस पांढरे, नाक सरळ, डोळे काळे, दाढी साधारण वाढलेली, अंगात नेसूस हाफ बाहिची बनियान, हाफ पँट, चप्पल असे आहे. सदरची व्यक्ती कोणाला आढळल्यास माणगाव पोलीस ठाणे दूरध्वनी क्र.(०२१४०-२६३००५) यावर संपर्क साधण्याचे आवाहन पोलीसांनी केले आहे. या घटनेची नोंद माणगाव पोलीस ठाण्यात मनुष्य मिसिंग रजि नंबर २३/२०२० प्रमाणे दाखल करण्यात आली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक रामदास इंगवले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र वाटवे हे करीत आहेत.
Comments
Post a Comment