जेएनपीटी खाजगीकरण आणि नौदल सुरक्षा पट्ट्याच्या प्रश्नाबाबत स्थानिकांसोबत राहणार - खा. सुनील तटकरे
वार्ताहर
जेेनपीटी : जेएनपीटी बंदराचे खाजगीकरणाच्या सुरू असलेल्या हालचाली आणि नौदल सुरक्षा पट्ट्याच्या सर्व्हेक्षणाला विरोध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस स्थानिकांच्या सोबत असेल असे प्रतिपादन रायगडचे खासदार सुनिल तटकरे यांनी उरण येथे बोलताना केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मेळावा आणि माजी आमदार सुरेश भाऊ लाड यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत ते उरण येथे आले होते. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे मत व्यक्त केले.
केंद्र सरकार जेएनपीटी बंदराचे खाजगीकरण करण्याचा डाव आखत असून याला विरोध करण्यासाठी मी स्वतः केंद्रीय मंत्री मनसूख मांडविया
यांच्याशी दोन वेळा चर्चा केली आहे. मात्र तरी देखिल केंद्रातर्फे जेएनपीटी बंदराचे खाजगीकरण करण्याचा प्रस्ताव जेएनपीटीच्या बोर्ड मिटींगमध्ये सादर करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस या धोरणाला विरोध करणार असल्याचे सुनिल तटकरे यांनी सांगितले. तसेच केंद्रीय संरक्षण मंत्रालयाने उरण परिसरात नौदल सुरक्षा पट्टा घोषित करण्यासाठी सर्व्हेक्षणाच्या हालचाली सूरू केल्या आहेत. या सर्व्हेक्षणाला विरोध करण्यासाठी आम्ही स्थानिक जनते सोबत राहणार असल्याचे सांगितले..
तत्पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आढावा बैठकीत बोलताना सुनिल तटकरे यांनी उरण तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस वाढविण्यासाठी स्थानिक कार्यकर्त्यांना बळ देणार असल्याचे सांगून तालुका स्तरावर बुथ कमिट्या नेमुन पक्ष वाढविण्याचे प्रयत्न करण्यात येणार असल्याचे सांगितले. यावेळेस त्यांनी केंद्र सरकारच्या कामगारविरोधी कायद्याचे आणि शेतकरी विरोधी कायद्यासंदर्भात केंद्र सरकारवर जोरदार टिका केली. याच कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुरेश लाड यांचा तटकरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष सुरेश लाड, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश चिटणीस प्रशांत पाटील, विधानसभा अध्यक्षा भावना घाणेकर, तालुका अध्यक्ष मनोज भगत, जिल्हा सरचिटणीस दिनेश म्हात्रे, मच्छीमार सेल उपाध्यक्ष जयेंद्र कोळी, शहर अध्यक्ष पुखराज सुथार,कार्याध्यक्ष रमण कासकर, गणेश नलावडे, महिलाध्यक्षा संध्या घरत, युवक अध्यक्ष तथा उपसरपंच समाधान म्हात्रे, संघटक प्रदिप तांडेल, संतोष ठाकूर, अमर ठाकूर, खलाशी संघटनेचे अध्यक्ष विश्वनाथ म्हात्रे आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे औचित्य साधून महिला नेत्या सिमा घरत, कामगार नेते भुषण पाटील, दिनेश पाटील, सामाजिक कार्यकर्ते संतोष पवार यांनी खा. सुनील तटकरे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.
Comments
Post a Comment