बाप्पाचे कारागीर राज दरबारी

बाप्पाचे कारागीर राज दरबारी

पेणमधील मूर्तीकार शिष्टमंडळाची कृष्णकुंजवर भेट



मनोज कळमकर

          खालापूर : गणेशमूर्तीचे माहेर घर असलेल्या पेण मधील मूर्तीकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने आपल्या विविध मागण्यांसाठी राज ठाकरेंची कृष्णकुंजवर भेट घेत गा-हाणी मांङली. लॉकडाउनच्या काळात अनेकांवर संकट कोसळलं असून आर्थिक समस्यांना सामोरं जावं लागत आहे. बुधवारी पेणमधील मूर्तीकार राज ठाकरेंच्या भेटीला पोहोचले होते. केंद्राने प्लास्टर ऑफ पॅरिसवर बंदी घातली असल्याने मूर्ती घडवणं कठीण जात असल्याची व्यथा त्यांनी राज ठाकरेंसमोर मांडली. तसेच बंदी उठवण्यासाठी मूर्तीकारांनी  मदत मागितली आहे.राज ठाकरे यांनी मात्र यावेळी मूर्तीकांना प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीच्या जागी शाडूच्या मूर्ती करण्याचा सल्ला दिला. 

         प्लास्टर ऑफ पॅरिसमुळे नदी, समुद्र यात मोठ्या प्रमाणात प्रदूषण होतं. विसर्जनानंतर चौपाट्यांवर त्यावर असंख्य गणपतीच्या मूर्ती दिसतात. हे चित्र फार भीषण असतं. इतक्या श्रद्धेने ज्या गणपती बाप्पाची पूजा, विसर्जन करतो तीच मूर्ती किनाऱ्याजवळ असलेलं दृष्य बघायला खूप विदारक असतं. त्यामुळे शक्य असेल तितक्या शाडूच्या किंवा मातीच्या मूर्ती बनवणं हे जास्त संयुक्तिक असेल असं राज ठाकरे यांनी मूर्तीकारांना सांगितलं. मूर्तीकांना वेगळा विचार करुन पाहण्याचा सल्ला दिला आहे. यावेळी त्यांनी उद्या जर परदेशातून मूर्ती आल्या तर तुम्ही काहीही करु शकत नाही अशी धोक्याची सूचनाही दिली. राज ठाकरेंनी यावेळी मूर्तीकारांना पर्यायी मार्गाचा विचार करण्याचा सल्ला देताना आपण समुद्रात विसर्जनासाठी काही वेगळा पर्याय उपलब्ध होईल का यासंबंधी सरकारमधील व्यक्तीशी चर्चा करु असं आश्वासन दिलं.

        या वेळी मनसे नेते  बाळा नांदगावकर , मनसे सचिव सचिन मोरे , रायगड जिल्हा अध्यक्ष जितेंद्र पाटील आणि पदाधिकारी उपस्थित होते.

Comments