मुंबई-गोवा महामार्गावर कानसई येथे अपघातात महिलेचा मृत्यू

मुंबई-गोवा महामार्गावर कानसई येथे अपघातात महिलेचा मृत्यू



महेंद्र म्हात्रे

         नागोठणे : मुंबई–गोवा महामार्गावरील नागोठणे जवळच असलेल्या कानसई गावाच्या हद्दीमध्ये असलेल्या बिजली हॉटेल समोर रस्त्यावरील  महाभयंकर खड्डयांमुळे मोटरसायकल जोरदार खड्डयांत आदळुन मोटरसायकलवर पाठीमागे बसलेल्या एका महिलेचा रस्त्यावर पडुन डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे मृत्यु झाला. हा अपघात आज मंगळवार, दि. ३ नोंव्हे. २०२० रोजी सकाळी ८.१५ वाजण्याच्या सुमारास घडला.

        याबाबत मिळालेल्या माहीतीनुसार महाड बाजुकडुन पाली (सुधागड) येथे जाणारी मोटरसायकल क्र. एमएच ०६ बीटी ०१९३ ही गाडी महामार्गावरील कानसई गावाच्या हद्दीमध्ये बिजली हॉटेलजवळ आल्यानंतर महामार्गावरील असलेल्या खड्यांमध्ये मोटरसायकल आदळल्यामुळे मोटरसायकलवर पाठीमागे बसलेल्या कल्पना किशोर लोलगे (वय ३२) या गाडीवरुन उडाल्यामुळे रस्त्यावर पडल्या. त्यामुळे त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने नागोठणे येथिल प्राथमिक आरोग्य दाखल करण्यात आले. परंतु उपचारादरम्यानच त्यांचा मृत्यु झाला. दरम्यान या अपघातात मोटरसायकलवरुन उडून महिला रस्त्यावर पडली असतांना समोरुन येणाऱ्या टँकर चालक सुनिल कुमार त्रिवेदी प्रसाद (वय २२) रा.महापे याचे देखिल रस्त्यावर पडलेल्या महिलेला वाचवता वाचवता टँकरवरील नियंत्रण सुटल्यामुळे टँकर सरळ जाऊन समोरील डिव्हायडरवर चढला. सुदैवाने या अपघातात टँकर चालक सुखरुप आहे. दरम्यान या अपघाताचा तपास नागोठणे पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक दादासाहेब घुटुकडे यांच्या मार्गदर्शनाखाली कदम करीत आहेत.

Comments