- Get link
- X
- Other Apps
रायगड जिल्ह्यात लेप्टोचे संशयित रुग्ण
वार्ताहर
अलिबाग : कोरोनातून बाहेर पडणार्या रायगड जिल्ह्यातील अलिबाग, पेण तालुक्यासह इतरही काही तालुक्यात लेप्टो स्पायरेसीस या आजाराचे संशयित रूग्ण आढळत असल्याने खळबळ उडाली आहे. या आजाराबाबत जिल्हा परीषदेची आरोग्य यंत्रणा मात्र झोपेतच असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. अशा प्रकारचा आजार शेतीच्या कापणी दरम्यान होत असल्याचे माहित असतानाही जनजागृतीची मोहिम राबविली जात नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
कोरोनाने रायगड जिल्हा आता हळूहळू सावरत असतानाच आता लेप्टो स्पायरोसीस डोके वर काढू लागला आहे. अलिबाग तालुक्यातील धोकवडे येथील लेप्टोच्या संशयित रूग्णाचा मुंबईतील लीलावती रूग्णालयात मृत्यू झाला तर नागाव येथे तीन संशयित रूग्णांचा मृत्यूने कवटाळले मात्र अद्यापही आरोग्य यंत्रणा या रूग्णांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे सांगू शकलेली नाही. नागावचे सरपंच निखील मयेकर यांनी यासंदर्भात जिल्हाधिकारी यांच्यासह जिल्हास्तरीय आरोग्य यंत्रणाना याची माहिती दिली आहे. दरम्यान अलिबाग तालुकयात लेप्टोचे साधारण 10 संशयित रूग्ण असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी यांनी सांगितले.
अलिबाग बरोबरच शेजारच्या पेण तालुक्यातदेखील लेप्टोचे संशयित रूग्ण असल्याचे जिल्हा परीषदेचे माजी कृषी सभापती प्रमोद पाटील यांनी सांगितले. मात्र आरोग्य यंत्रणा त्याकडे डोळेझाक करीत असल्याचा आरोप पाटील यांनी केला आहे. लेप्टोच्या साथीमुळे ग्रामीण भागात नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण आहे मात्र जिल्हा परीषदेच्या आरोग्य यंत्रणेने ही बाब गांभर्याने घेतलेली दिसत नाही.
लेप्टोस्पायरेसीस या आजाराचा फैलाव जनावरांच्या मलमूत्रातून होत असतो. विशेषतः शेतामध्ये धान्य खाण्यासाठी येणारे उंदीर या आजाराचा फैलाव अधिक करतात. त्यामुळे दरवर्षी साधारण भातकापणीच्या हंगामात या रोगाचा प्रसार होत असतो. पायाला किंवा हाताला जखम झाली असेल तर त्याव्दारे जनावरांच्या मलमूत्राने दूषित झालेले पाणी शरीरात शिरते आणि हा आजार उदभवतो. त्यामुळे भातकापणीसाठी शेतात जाणार असाल तर काळजी घेणे आवश्यक आहे. शेतात काम करताना पायात गमबूट घालावेत, जखमा झाल्या असतील तर त्यावर तातडीने उपचार करावेत, असे आवाहन आरोग्य यंत्रणेने केले आहे.
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment