कर्जत तालुक्यातील खैरपाडा गावात १० दिवसात ५ जणांचे मृत्यू

वारे जवळील खैरपाडा गावात १० दिवसात ५ जणांचे मृत्यू



गणेश पवार

          कर्जत : तालुक्यातील वारे ग्रामपंचायतमधील खैरपाडा गावात मागील १० दिवसात पाच जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. अचानक मृत्यू पावत असलेल्या व्यक्तींना कोरोनाची कोणतीही लक्षणे नाहीत, त्यामुळे आरोग्य यंत्रणा संभ्रमात सापडली आहे. दरम्यान, आरोग्य विभागाने संपूर्ण गावातील व्यक्तींची तपासणी केली असून होणाऱ्या मृत्यूबाबत कोणतीही माहिती पुढे येत नसल्याने वारे ग्रामपंचायत परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

            कर्जत-मुरबाड राष्ट्रीय महामार्ग रस्त्यावर वारे ग्रामपंचायत असून या ग्रामपंचायतमधील खैरपाडा गावात मागील १० दिवसापासून भीतीचे वातावरण पसरले आहे. जेमतेम ४० घरांची वस्ती असलेल्या खैरपाडा गावात ९ नोव्हेंबर रोजी एक ४२ वर्षीय व्यक्ती किरकोळ आजाराने मृत्युमुखी पडली. त्यानंतर आतापर्यंत तब्बल पाच जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. त्यातील तीन रुग्ण हे अनुक्रमे एमजीएम रुग्णालय कलंबोली, साई हॉस्पिटल नेरळ आणि उल्हासनगर येथील रुग्णालयात दाखल केले होते. तर दोन व्यक्तींचे मृत्यू हे हृदयविकाराचा झटका आल्याने झाले. मात्र सर्व मृत्युमुखी पडलेल्या व्यक्ती यांच्या तोंडातून रक्ताच्या उलट्या झाल्या आहेत हे विशेष साम्य आहे. गुरुवार, दि. १९ नोव्हेंबर रोजी  देखील एक ४२ वर्षीय आदिवासी पुरुष मृत्युमुखी पडला असून त्या सर्व व्यक्तींच्या मृत्यूनंतर कळंब प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय पथकाने गावात जाऊन पाहणी केली असता गावातील कोणत्याही व्यक्तीला कोरोना झाला नाही आणि कोणत्याही व्यक्तीला कोरोनाची लक्षणे देखील नाहीत. यामुळे संपूर्ण वारे ग्रामपंचायतमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून खैरपाडा गावातील कोणी व्यक्ती आजूबाजूला दिसला तरी आजूबाजूचे लोक बाजूला होतात. अचानक झालेले मृत्यू लक्षात घेता कळंब प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. निलेश यादव यांनी सर्व रहिवासी यांची आरोग्य तपासणी केली. त्यात कोणत्याही व्यक्तीला कोरोनाची लक्षणे नाहीत, त्यामुळे आरोग्य विभाग देखील संभ्रमात सापडला आहे.

Comments