माणगाव नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीसाठी २७ नोव्हेंबरला नगरसेवक पदाची आरक्षण सोडत
सलीम शेख
माणगाव : २०२१ मध्ये होणाऱ्या माणगाव नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी नगरसेवक पदाची आरक्षण सोडत शुक्रवार, दि. २७ नोव्हेंबर २०२० रोजी सकाळी ११ वा. मध्यवर्ती प्रशासकीय भवन तहसील कार्यालय माणगाव येथील सभागृहात तालुक्याच्या प्रांताधिकारी प्रशाली जाधव-दिघावकर यांच्या अध्यक्षतेखाली काढण्यात येणार आहे. हे आरक्षण वार्डातून काय पडणार याची उत्सुकता सर्व माणगावकरांना लागून राहिली आहे.
माणगाव नगरपंचायतीची मागील निवडणूक १० जानेवारी २०१६ रोजी झाली होती. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सर्वाधिक जागा जिंकून नगरपंचायतीवर सत्ता प्रस्थापित केली होती. मागील निवडणुकीचा विचार करता येणाऱ्या २०२१ च्या माणगाव नगरपंचायत निवडणुकीसाठी सर्व वार्डांतून विविध पक्षाचे अनेक कार्यकर्ते उमेदवारी करण्यास इच्छुक असून या सर्वांच्या नजरा आरक्षण सोडतीकडे लागल्या असून आपल्या वार्डात काय आरक्षण पडते याची वाट बघत आहेत.
माणगाव नगरपंचायतीची २०१६ ची झालेली सार्वत्रिक निवडणूक पाहता २०२१ ची निवडणूक कोणत्या पद्धतीने लढवली जाईल याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व मित्रपक्ष अशी महविकास आघाडी तयार करण्यात आली आहे. ही आघाडी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राहील की नाही हे पाहणे देखील औत्सुक्याचे ठरेल. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत बहुतांशी गावांतून आघाडी झाली नसल्याचेच दिसून आले आहे. त्यातच माणगाव नगरपंचायत निवडणुकीत मागच्या वेळेस राष्ट्रवादी काँग्रेस व विरोधी पक्षात काटेकी टक्कर झाली होती. माणगावात नेहमीच राष्ट्रवादी काँग्रेस विरोधात इतर पक्ष लढलेले आहेत. त्यामुळे यावेळेसही तीच परिस्थिती कायम राहील असे दिसते. या माणगाव नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी सर्वच वार्डांतून सर्वच पक्षाचे कार्यकर्ते उमेदवारी करण्यास इच्छुक असून २७ नोव्हेंबर रोजी पडणाऱ्या आरक्षण सोडतीनंतरच खऱ्या अर्थाने इच्छुकांची नावे पुढे येणार आहेत. काही इच्छुक उमेदवारांनी गेल्या तीन महिन्यांपासूनच आपली मोर्चेबांधणी सुरू केली असून माणगाव नगरपंचायतीवर यावेळेस कोणाची सत्ता येणार याचीही उत्सुकता सर्वांना लागून आहे.
Comments
Post a Comment