शाळा सुरू करण्यासाठी स्थानिक प्रशासन निर्णय घेणार ! - शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड
प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्रातील शैक्षणिक संस्थेतील नववी ते अकरावीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. तथापि, शाळा सुरू करत असताना स्थानिक प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेऊनच शाळा सुरू कराव्यात. कोरोनाचा प्रादुर्भाव असलेल्या जिल्ह्यातील शाळा सुरू करत असताना स्थानिक जिल्हाधिकारी, गट विकास अधिकारी व शिक्षण अधिकारी यांनी विचार विनिमय करूनच विद्यार्थ्यांचे आरोग्य व शैक्षणिक हित जपूनच निर्णय घ्यावा, अशा सूचना देण्यात आल्या असल्याचे शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी सांगितले.
या आदेशानुसार राज्यातील शाळा सुरू होण्याच्या दृष्टीने स्थानिक प्रशासनाचा निर्णय महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी या संदर्भात शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांना योग्य त्या सुचना दिल्या आहेत. प्रत्यक्ष वर्ग सुरू झाले नाही तरी ऑनलाईन शिक्षण पद्धती चालूच राहणार आहे. कोरोनाच्या महामारीच्या संकटात विद्यार्थी व शिक्षकांचे आरोग्य जपण्यासाठीच शिक्षण विभागाने हा निर्णय घेतला असल्याचे शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी सांगितले.
Comments
Post a Comment