माथेरानमधील मुजोर पोलिसावर निलंबनाची कारवाई
गणेश पवार
कर्जत : माथेरानमधील काँग्रेसच्या अल्पसंख्यांक सेलचे अध्यक्ष व येथील व्यावसायिक बिलाल महाबळे तसेच पत्रकार दिनेश सुतार यांना येथील मुजोर पोलीस श्याम जाधव यांनी मद्यधुंद अवस्थेत शिवीगाळ तसेच मारहाण केल्याप्रकरणी रायगड जिल्हा अधिक्षक यांनी जाधव यांच्यावर तडकाफडकी निलंबनाची कारवाई केली आहे.
२० नोव्हेंबर रोजी रात्री ११:३० वाजता ठाणे अंमलदार असताना पोलीस नाईक शाम जाधव मद्यधुंद अवस्थेत बिलाल महाबळे यांच्या दुकानामध्ये गेले. दुकान बंद असताना देखील शाम जाधव यांनी पान दे असे सांगितले. त्यावर बिलाल यांनी दुकान बंद आहे पान हे बनवावं लागेल. सर्व सामान भरलं आहे त्यामुळे मी पान देऊ शकत नाही. तुम्हाला दुसरं काही हवं असेल तर दुकान उघडून देतो असे सांगितले. यावर पारा चढलेल्या जाधव यांनी अश्लील भाषेत शिवीगाळ करत भर बाजारात पोलीस काठीने बिलाल यांना मारहाण केली. यावर बिलाल यांनी पोलिसात तक्रार करताच फिर्यादी बिलाल महाबळे व पोलीस नाईक शाम जाधव यांची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी नगरपालिका रुग्णालयात जात असताना पत्रकार दिनेश सुतार हे वार्तांकन करण्यासाठी गेले असता त्यांनाही अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली तसेच मारहाण देखील केली. याबाबत दिनेश सुतार यांनी पोलीस ठाण्यात लेखी तक्रार केली आणि याचा जिल्ह्यातील रायगड प्रेस क्लब तसेच मराठी पत्रकार परिषदेने तीव्र शब्दात निषेध व्यक्त करून संबंधित मुजोर पोलिसावर कडक कारवाई करावी अशी मागणी जोर धरू लागली. रायगड प्रेस क्लबचे माजी अध्यक्ष संतोष पेरणे यांनी हे प्रकरण लावून धरले. प्रेस क्लबचे अध्यक्ष अनिल भोळे यांनी याला दुजोरा देत पत्रकारांवरील हल्ले सहन केले जाणार नाही असे सांगितले.
रायगड पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांनी याची गंभीर दखल घेत पुढील आदेश मिळेपर्यंत जाधव यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पत्रकारांनी तसेच रायगड प्रेस क्लबने समाधान व्यक्त करत पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांचे आभार मानले आहेत.
Comments
Post a Comment