तळाशेत ग्रामपंचातीवर शिवसेनेचा भगवा!
सरपंच पदी रोशनी राजेंद्र नवगणे
एक सदस्य फुटल्याने राष्ट्रवादीवर आत्मचिंतनाची वेळ
सलीम शेख
माणगाव : रायगड जिल्ह्यातील राजकीय दृष्ट्या अत्यंतमहत्वाच्या अशा ओळखल्या जाणाऱ्या माणगाव तालुक्यातील तळाशेत (इंदापूर) ग्रुप ग्रामपंचायतीवर चत्मकारीकरीत्या शिवसेनेचा भगवा फडकला असून सरपंचपदी शिवसेनेच्या रोशनी राजेंद्र नवगणे यांचा ८ विरुद्ध ७ अशा १ मताने विजयी होऊन त्या सरपंचपदी विराजमान झाल्या आहेत. सरपंचपदाच्या या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा एक ग्रामपंचायत सदस्य फुटल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर आपला कोण सदस्य फुटला अशी आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे.
माणगाव तालुक्यातील तळाशेत ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक ३ मार्च २०१९ रोजी झाली होती. त्यावेळी सरपंचपदाची निवडणूक थेट जनतेतून होऊन सरपंचपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे स्व. दिनेश महाजन हे निवडून येऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे १५ पैकी ८ सदस्य निवडून येऊन तळाशेत ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकला होता. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सरपंच दिनेश महाजन यांचे ९ ऑक्टोबर २०२० रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. या रिक्त झालेल्या सरपंचपदाच्या जागेसाठी सोमवार दि. २३ नोव्हेंबर २०२० रोजी तळाशेत ग्रामपंचायत कार्यालय याठिकाणी शासनाच्या नवीन निकषानुसार ग्रामपंचात सदस्यातून सरपंच पदाची निवडणूक अध्यासी अधिकारी एम. डी. पालांडे यांच्या अधिपत्याखाली घेण्यात आली. सरपंच पदाच्या या निवडणुकीसाठी सकाळी ११ ते २ यावेळेत शिवसेनेकडून रोशनी राजेंद्र नवगणे तर राष्ट्रवादीकडून स्व. दिनेश महाजनयांच्या पत्नी दीप्ती दिनेश महाजन यांनी नामनिर्देशन अर्ज दाखल केला होता. त्यानंतर दुपारी १ ते २ यावेळेत अर्जाची छाननी होऊन त्यानंतर निवडणूक प्रक्रियेच्या मतदानास सुरुवात करण्यात आली. हिनिवडणूक दोन्ही पक्षातील सदस्यांच्या मतानुसार गुप्त मतदान पद्धतीने घेण्यात आली. यामध्ये शिवसेनेच्या रोशनी नवगणे यांना ८ मते मिळून त्यांचा विजय झाला. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दीप्ती महाजन यांना ७ मते मिळून १ मतांनी त्यांचा पराभव होऊन तळाशेत ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी शिवसेनेच्या रोशनी नवगणे निवडून आल्याचे अध्यासी अधिकारी एम. डी. पालांडे यांनी घोषित केले. याकामी त्यांना मदतनीस म्हणून ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक एस. एच. पाटील यांनी कामकाज पहिले.
माणगाव तालुक्यातील तळाशेत ग्रामपंचायतीच्या या सरपंच पदाच्या निवडणुकीकडे संपूर्ण रायगड जिल्ह्याचे लक्ष लागले होते. कारण २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीत जवळपास १० वर्षांनी राष्ट्रवादीचा झेंडा फडकुन या निकालानंतर त्यावेळी शिवसेना व राष्ट्रवादीत इंदापूरमध्ये धुमश्चक्री उडाली होती. त्यामुळे सोमवारी झालेल्या तळाशेत ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या निवडणुकीवेळी सकाळपासून याठिकाणी माणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली तळाशेत ग्रामपंचायत कार्यालय याठिकाणी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
या निवडणुकीचा निकाल ऐकण्यासाठी शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते इंदापूरला उपस्थित होते. दुपारी २ वा. सरपंच पदाच्या निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाल्यावर तब्बल १ तासांनी तळाशेत ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी शिवसेनेच्या रोशनी नवगणे निवडून आल्याचे जाहीर होताच शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष करीत आनंद व्यक्त करून इंदापूर येथे फटाक्यांचीआतषबाजी करीत आनंदोत्सव साजरा केला. तर या चमत्कारीकरीत्या लागलेल्या निकालाचा राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांना एक प्रकारे धक्काच बसला. या निवडणुकीवेळी शिवसेनेचे नवनिर्वाचित सरपंच रोशनी नवगणे, सदस्य नितीन घोणे, संतोष मुंढे, कोमल गायकवाड, अश्विनी नाकते ,तुकाराम शेलार, प्रतीक्षा जाधव हे सात सदस्य उपस्थित होते. तर राष्ट्रवादीचे उपसरपंच उदय अधिकारी, उमेदवार दीप्ती महाजन, समीर मेहता, प्रमोद मिरजकर, अमोल पाटील, राजेश्री मुंढे, शीतल सुतार, स्मिता सागवेकर हे आठ सदस्य उपस्थित होते. राष्ट्रवादीच्या आठ सदस्यांपैकी एक सदस्य कोण फुटला? याची जोरदार चर्चा सोमवारी दिवसभर इंदापूरसह माणगाव तालुक्यात सुरु होती. सरपंचपदी निवडून आल्यावर रोशनी नवगणे यांचे ग्रामपंचायत कार्यालय येथे शिवसेनेचे इंदापूर येथील दक्षिण रायगड जिल्हाप्रमुख अनिल नवगणे, राजिप सद्स्या स्वाती नवगणे, माणगाव तालुका भाजपचे अध्यक्ष संजयआप्पा ढवळे, माजी ग्रामपंचायत सद्स्या मेघनाथ सातपुते, सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र नवगणे, शिवसेनेचे उपस्थित सर्व ग्रामपंचायत सदस्य तसेच अनेक शिवसैनिकांनी अभिनंदन करून त्यांना पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या. शिवसेनेच्या या चमत्कारीकरीत्या झालेल्या सरपंचपदाच्या निवडीनंतर प्रतिक्रिया देताना दक्षिण रायगड शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल नवगणे म्हणाले कि, हा विजय सर्व जनतेचा व शिवसैनिकांचा आहे. मागच्या निवडणुकीत आमचा अल्पशा मतांनी पराभव झाला होता. काम करणाऱ्या व्यक्तीच्या पाठीशी जनता असते. या ग्रामपंचायतीत घडलेला हा दैवी चमत्कारच म्हणावा लागेल. नवनिर्वाचित शिवसेनेच्या सरपंचा रोशनी नवगणे यांनी आपली सरपंचपदी निवड झाल्यावर पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच सहकारी सर्व ग्रामपंचायत सदस्य व ज्यांनी मला आवश्यक असलेले एक मोलाचे मत दिले त्यांचे सर्वांचे मनापासून ऋण व आभार व्यक्त केले.
Comments
Post a Comment