योगींच्या दौऱ्यावरुन वातावरण तापलं; मनसेची मुंबईत पोस्टरबाजी
मुंबईः उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे दोन दिवसीय मुंबईच्या दौऱ्यावर आले आहेत. मुंबईत आल्यानंतर त्यांनी उद्योजकांची भेट घेतली आहे. गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी योगींचा हा दौरा असल्याचं बोललं जात आहे. योगी आदित्यनाथ यांच्या दौऱ्यावरुन राज्यातील राजकारण तापलं आहे. मनसेनंही योगी आदित्यनाथ यांच्या दौऱ्यावरुन टीका केली आहे.
योगी आदित्यनाथ वास्तव्यास असलेल्या मुंबईतील ट्रायडेंट हॉटेलमध्ये वास्तव्यास आहेत. त्यांच्या या हॉटेलबाहेर मनसेकडून पोस्टरबाजी करण्यात आली आहे. योगी आदित्यनाथांचा 'ठग' असा उल्लेख करत मनसेनं निशाणा साधला आहे.
मनसेनं लावलेल्या पोस्टरवर ' कहा राजा भोज और कहा गंगू तेली... कुठं महाराष्ट्राचं वैभव तर तुठे युपीचं दारिद्र्य... असं म्हटलं आहे. तसंच, 'भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांनी स्थापन केलेली चित्रपटसृष्टी, युपीला नेण्याचं मुंगेरीलालचं स्वप्न. अपयशी राज्यातील बेरोजगारी लपवण्यासाठी मुंबईतील उद्योग पळवण्यासाठी आलेला ठग,' असं या पोस्टरवर लिहण्यात आलं आहे.
महाविकास आघाडीकडून टीका
योगी आदित्यनाथ यांच्या मुंबई दौऱ्याने आधीच वादळ उठलेले आहे. मुंबईतील बॉलिवूड उत्तर प्रदेशात नेण्याचा डाव भाजपने रचला आहे, असा आरोप महाविकास आघाडीचे नेते सातत्याने करत आहेत. योगी आदित्यनाथ हे मुंबई दौऱ्यात बॉलिवूडच्या निर्मात्यांना धमकावू शकतात. त्याबाबत सरकारने खबरदारी बाळगावी, अशी भीती काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आधीच व्यक्त केली आहे. गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनीही मंगळवारी योगींवर निशाणा साधला आहे. मुंबईतील सिनेसृष्टी उत्तर प्रदेशात नेण्याचा भाजपचा डाव आम्ही यशस्वी होऊ देणार नाही. सिनेसृष्टी ही महाराष्ट्राची आणि मुंबईची शान आहे. येथे सर्व सुविधा उपलब्ध आहेत. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत सिनेसृष्टी इतर राज्यात जाऊ देणार नाही, असे पाटील यांनी सांगितले.
Comments
Post a Comment