यांत्रिक नौकांद्वारे मासेमारी फक्त कागदावर बंदी

उरणमध्ये खुलेआम मासेमारी सुरूच

घन:श्याम कडू
           उरण : मासेमारीस बंदी असतानाही उरण परिसरात खुलेआम मासेमारी सुरू आहे. बंदी काळात मासेमारी करणाऱ्या काही मासेमारी बोटींवर दोन वेळा कारवाई करण्यात आली मात्र त्यानंतर पुढील काय कारवाई होते हे गुलदस्त्यात आहे. त्यामुळे कारवाई झाली तरी उरण परिसरात खुलेआम यांत्रिक नौकांद्वारे मासेमारी सुरूच आहे.  कोरोनाचा महासंकट असतानाही सर्व नियमांची पायमल्ली करून मासळी बाजार उरणमध्ये भरतो.
        महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम 1981 अंतर्गत मासेमारी बंदी कालावधी दि.१ जून ते ३१ जुलै (दोन्ही दिवस धरुन 61 दिवस) या कालावधीकरिता शासनाच्या कृषी व पदुम आणि मत्स्यव्यवसाय विभागाने दि.१ जून ते ३१ जुलै (दोन्ही दिवस धरुन 61 दिवस) मासेमारी बंदी कालावधी निश्चित केला आहे.
         यानुसार राज्याच्या सागरी जलधी क्षेत्रात (सागरी किनाऱ्यापासून १२ सागरी मैलांपर्यत) यांत्रिकी मासेमारी नौकांना पावसाळी मासेमारी बंदी लागू करण्यात आल्याचे यापूर्वी सर्व सागरी मच्छिमारी संस्थांना पत्राद्वारे तसेच स्थानिक वृत्तपत्रांद्वारे जाहीर आवाहन केले होते, असे असतानाही पावसाळी बंदी कालावधीत मासेमारी चालू असल्याच्या तक्रारी या कार्यालयास प्राप्त झाल्या आहेत. या तक्रारीच्या अनुषंगाने मासेमारी बंदी कालावधीत यापुढे कोणत्याही प्रकारच्या यांत्रिक नौकांद्वारे मासेमारी करताना आढळल्यास त्या नौकांवर कठोर कारवाई करण्यात येईल. तसेच त्या नौकांचा मासेमारी परवाना रद्द करुन नौकांची नौका नोंदणी रद्द करण्यात येईल, याची जिल्ह्यातील मच्छिमार बांधवांनी कटाक्षाने नोंद घ्यावी, असे आवाहन मत्स्यव्यवसाय विभागाचे सहाय्यक आयुक्त सुरेश भारती यांनी केले आहे.
       
          देशात व राज्यात कोरोना कोविड १९ चा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत आहे. यामुळे सोशल डिस्टंट, मास्क वापरणे बंधनकारक असतानाही  उरण परिसरात या नियमांचे उल्लंघन करून आजही मासेमारी खुलेआम सुरू आहे. काही दिवसांपूर्वी दोनवेळा मासेमारी करणाऱ्या बोटींवर कारवाई करण्यात आली. मात्र ही कारवाई झाल्यानंतर त्याचे पुढे काय होते हे गुलदस्त्यातच आहे. अशा प्रकारच्या कारवाई होऊनही उरण परिसरात करंजा, भेंडखळ, वशेणी व इतर खोल समुद्र किनारी मासेमारी करून आलेल्या बोटींतील मासळीची विक्री होत आहे. ही मासळी खरेदी करण्यासाठी मुबंई, नवी मुंबई, ठाणे, डोंबिवली, वाशी, पनवेल अशा कोरोना हॉस्पॉट ठिकाणावरून हजारोंजण येत असतात. जर मासेमारी करणाऱ्या बोटींवर कारवाई होत असतानाही आजच्या घडीला मासेमारी करण्यासाठी बोटी जातातच कशा असा सवाल यानिमित्ताने उभा रहात आहे. तरी याची सखोल चौकशी करून दोषीं बोट मालकांवर कडक कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
     
          जिल्हयात आजपर्यंत ५६ बोटींवर कारवाई केली असून त्यांचे १ महिन्यासाठी परवाना रद्द केले आहेत. पुढील कारवाईसाठी तहसीलदार यांच्याकडे पाठविले जाते. जिल्हा मोठा असतानाही फक्त एकच परवाना अधिकारी आहे व ४५ लँडिंग सेंटर आहेत.त्यामुळे मनुष्यबळ कमी पडतो. आमच्याकडून कारवाई सुरूच असून त्याबाबत जिल्हाधिकारी, प्रांत, तहसीलदार, पोलीस ठाणे यांना पत्रे दिली आहेत. वृत्तपत्रात बातम्याही प्रसिद्ध झाल्या आहेत. 
- सुरेश भारती
मत्स्यव्यवसाय विभागाचे सहाय्यक आयुक्त

Comments