माथेरानमधील शिवसेनेतील संघर्षाने फूट अटळ


मुकुंद रांजाणे

           माथेरान : येथील शिवसेनेमध्ये मागील काही दिवसांपासून सुरु असलेल्या संघर्षाने आता वेगळे वळण घेतले असून सुरु असलेल्या घडामोडींमुळे सेनेला खिंडार पडणार असल्याचे समोर येत आहे. मागील नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादीचा एक गट सेनेमध्ये दाखल झाला होता व 'आता हवा बदल' नवा ह्या ट्यागलाईन खाली निवडणूक लढवीत माथेरान पालिकेवर एक हाती सत्ता स्थापन केली होती काही महिने सुरळीत गेल्यानंतर सेनेमध्ये नवा जुना वाद सुरु झाला होता. नव्याने सेनेत दाखल झालेल्याना बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक जुमानत नसल्याचे चित्र समोर येत होते. अनेकवेळा संघर्षाच्या बातम्या समोर येत होत्या पण कोणीही हे मान्य करीत नव्हते, त्यातूनच सत्ता आमच्यामुळे आली ह्या प्रश्नावरून वादावादी सुरूच होती त्यामुळे दोन मतांतरे व्हायला सुरुवात झाली. त्यातच नवा जुना वाद विकोपाला गेला होता, त्यामुळे अघोषित दोन गट समोर येत होते. दोन गटांचे वेगवेगळे पाठीराखे तयार झाले होते व सेनेचा निष्ठावंत मात्र ह्यामध्ये कुठेच नजरेस पडत नव्हता.
         ज्यांनी पडत्या काळात शिवसेनेचा भगवा डौलत ठेवला तो सैनिक मात्र ह्या गटबाजीने अस्वस्थ दिसत होता. सेनेतच दोन नेतृत्व निर्माण झाल्यानंतर कोणता झेंडा घेऊ हाती अशी त्यांची अवस्था झाली होती, त्यामुळे हा वाद वरिष्ठांच्या कानावर घालण्यासाठी नेरळ येथे खासदारांच्या अध्यक्षतेखाली सभा बोलविण्यात आली, पण तेथे खासदार श्रीरंग बारणे यांच्या समोर हे प्रकरण हातापायीवर आल्याने सभा गुंडाळण्यात आली व तेथूनच शिवसेनेतील संघर्षाचा वणवा पेटला व माथेरान शिवसेना शाखाप्रमुख पद बदलावे अशी मागणी एका गटाकडून सुरु झाली. हा शिवसेनेत नव्याने दाखल झालेला गट होता त्यामुळे काही जुन्या सैनिकांना हा विचार रुचला नाही व ही सर्व जुनी मंडळी पुन्हा एकत्र येऊन शिवसेनेच्या नावाखाली अनेक कार्यक्रम राबवित आहेत पण ह्या नाट्याला मागील आठवड्यापासून वेगळे रूप मिळाले असून शाखाप्रमुख पद बदलण्यासाठी दोनवेळा हा गट आमदारांची भेट घेऊन मागणी करीत होता व आमदारांनी त्यास नकार दिल्याने हा सध्या चर्चेचा विषय माथेरानमध्ये ठरत आहे. माथेरानच्या शिवसेना शाखा वर्धापन दिनी ह्या दोन्ही गटांनी आपले वेगवेगळे शक्ती प्रदर्शन करून पुढील संघर्षाची झलक दाखवून दिली असून माथेरान पालिकेच्या निवडणुकीस अजून दीड वर्षांचा काळ बाकी असताना माथेरानमध्ये मात्र निवडणूक तोंडावरच येऊन ठेपली असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
         एकहाती सत्ता मिळाल्यानंतर माथेरानकरांना विकासाचे स्वप्न दाखविणाऱ्या सेनेच्या ह्या भूमिकेमुळे नागरिकांचा मात्र भ्रमनिरास झाला असून येणारी निवडणूक हि नेत्यांबरोबरच मतदाराचीही कसोटी पाहणारी असणार आहे हे निश्चित आहे.

Comments