माणगाव तालुक्यात आणखी १९ रुग्णांची भर

माणगाव तालुक्यात आणखी १९ रुग्णांची भर 

कोरोनाबाधितांचा आकडा पोहचला २०३ वर 


सलीम शेख
            माणगाव : जगभरात हाहाकार उडवून देणाऱ्या कोरोना महामारीने रायगड जिल्ह्यातही धुमाकूळ घातला आहे.जिल्ह्यातील बहुतांशी तालुक्यात कोरोनाचे रुग्ण आढळले असून जिल्हा प्रशासनाची धावाधाव उडाली आहे.या महामारीने माणगाव तालुक्यात कहरच केला आहे. रुग्ण बरे होण्याची संख्या चांगली असली तरी तेवढ्याच प्रमाणात तालुक्यात वरवर रुग्ण वाढत असल्याने प्रशासनाबरोबरच तालुक्यातील जनतेने याची धास्ती घेतली आहे. माणगाव तालुक्यात माणगाव नगरपंचायत हद्दीत ७ रुग्ण, मोर्बा गावांत १० रुग्ण, भिनाड गावात १ रुग्ण, साई गावात १ रुग्ण असे एकूण १९ नवे कोरोना रुग्ण आढळून आल्याची माहिती  बुधवार, दि.१५ जुलै २०२० रोजी   माणगाव उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रदीप इंगोले यांनी प्रसार माध्यमांना दिली.
          माणगाव तालुक्यात लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यापासून कोरोनाचे रुग्ण आढळण्यास सुरुवात झाली. आतापर्यंत तालुक्यातील ४० गावांतून २०३ जणांना कोरोनाची लागण झाली असून यापैकी १२५ रुग्ण स्वतः च्या इच्छाशक्ती व प्रतिकार शक्तीच्या जोरावर पूर्णपणे बरे होऊन आपल्या घरी गेले असून दोघा रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या तालुक्यात बाधितांची संख्या ७६ आहे. माणगाव तालुक्यात प्रशासन कोरोना महामारीवर मात करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहे. या प्रशासनाला तालुक्यातील जनतेने आपली नैतिक जबाबदारी समजून सहकार्य करणे आवश्यक आहे. आजपासून २६ जुलैपर्यंत रायगड जिल्हा लॉकडाऊन झाल्याचे आदेश रायगड जिल्हाधिकारी यांनी जाहीर केले आहे. या लॉकडाऊन काळात नागरिकांनी अत्यावश्यक कामाव्यतिरिक्त घराबाहेर पडू नका, स्वतःची व आपल्या कुटुंबाची काळजी घेवून प्रशासनाला सहकार्य करा असे आवाहन तालुक्याच्या प्रांताधिकारी प्रशाली जाधव दिघावकर यांनी केले आहे.

Comments