घन:श्याम कडू
उरण : कोरोना कोविड १९ महामारीचे संकट उरणकरांवर घोंघावत आहे. अनेकांना या आजाराने ग्रासले आहे. त्यांच्यावर उपचार करणारी यंत्रणा अपुरी ठरत आहे. त्यामुळे बळींचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. तरी येथील करोडो रुपयांचा नफा कमविणाऱ्या कंपनीने पुढाकार घेऊन मदतीचा हातभार देऊन उपचार यंत्रणा सक्षम करावी जेणेकरून त्यामुळे उरणकरांचे कोरोना संकटातून जीव वाचण्यास मदत होईल.
देशात व राज्यात कोरोनारूपी महासंकट आले आहे. याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होऊन आता परिस्थिती गंभीर बनत चालली. त्यात बळींचा आकडाही दिवसेंदिवस वाढत चालला आहे. उरणमध्ये ही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. दररोज पेशंट सापडू लागले आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने दम लागणारे पेशंट जास्त आहेत. त्यांना ऑक्सिजनची नितांत गरज लागत आहे. परंतु याच गोष्टींची मोठी कमतरता जाणवत आहे. ही सोय साध्य तरी उरणमध्ये नसल्या कारणाने पेशंटला पनवेलला हलवायला लागते. पनवेलमध्येही हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यासाठी ऑक्सिजन बेडच खाली नाही. यामुळे उरणचा पेशंट ऑक्सिजन अभावी ताटकळत रहातो. त्यामध्ये त्याचा मृत्यू होण्याची शक्यता असते.
याबाबत जिल्हाधिकारी निधी चौधरी व माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांनी प्रयत्न करून जेएनपीटीला स्टाफसहित ऑक्सिजन बेडची व्यवस्था करण्यास सांगितले आहे. त्यास जेएनपीटी प्रशासनाने मान्यता दिल्याचे समजते. याच बरोबर या परिसरात जेएनपीटीसह ओएनजीसी, बीपीसीएल, जीटीआय, डीपीवर्ल्ड, सिंगापूर पोर्ट, विद्युत प्रकल्प कार्यरत आहेत. त्यांनी मदतीचा हातभार दिला असेल परंतु ती मदत शेवटच्या टोकापर्यंत पोहचली असे वाटत नाही.
संबंधित कंपन्यांनी आपला सीआरएस फंडाचा वापर कोरोनाच्या महामारी संकटातून उरणकरांना वाचविण्यासाठी करण्यास हरकत नाही. त्यांनी उरणकरांचे सुसज्ज हॉस्पिटलचे स्वप्न पूर्ण होईल तेव्हा होईल, पण आता कोरोनावर उरणच्या पेशंटवर उपचार करण्यासाठी सुसज्ज उपचार यंत्रणा राबविण्यासाठी पुढाकार घेण्यास हरकत नाही. त्यांच्या येथे काम करणारा वर्ग हा उरणमधील स्थानिक जास्त आहे. त्यामुळे ही उपचार यंत्रणा राबविली नाही तर त्याचा विपरीत परिणाम येथील कंपन्यांवर होऊन कामकाज ठप्प होऊ शकते. याचा विचार येथील कंपनी प्रशासनाने करावा अशी उरणकरांची मागणी आहे.
Comments
Post a Comment