माणगाव पोलीस ठाण्यात कोरोनाचा शिरकाव

माणगाव पोलीस ठाण्यात कोरोनाचा शिरकाव 

पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह



सलीम शेख
           माणगाव : तालुक्यात कोरोनाचा संसर्ग वाढत चालला असून सरकारी कार्यालयातून तसेच घरातून आता कोरोनाचे रुग्ण आढळू लागले असून माणगाव पोलीस ठाण्यात कोरोनाने शिरकाव केला असून येथील एका पोलीस अधिकाऱ्याचा व एका कर्मचाऱ्याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने पोलीसवाले आता   चांगलेच धास्तावले आहेत. तालुक्यात माणगाव येथे १,विहुळे येथे १, इंदापूर येथे १ व मोर्बा येथील ४ रुग्ण अशा एकूण ७ रुग्णांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून ७  रुग्णांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्याची माहिती माणगाव उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.प्रदीप इंगोले यांनी सोमवार दि.६ जुलै २०२० रोजी सकाळी प्रसार माध्यमांना दिली.
           माणगावात एका पोलीस अधिकाऱ्याचा रिपोर्ट   रविवारी सायंकाळी पॉझिटिव्ह आला असून या अगोदर एका पोलीस कर्मचाऱ्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.माणगाव उपजिल्हा रुग्णालय, तहसील कार्यालय पाठोपाठ  आता पोलीस ठाण्यात कोरोना रुग्ण आढळून आले आहेत.त्यामुळे साऱ्यांचेच टेंशन वाढले आहे.तालुक्यातील ३३ गावांतून आतापर्यंत १३३ कोरोनाचे रुग्ण आढळून आले असून त्यापैकी ६९ रुग्ण पूर्णपणे बरे होऊन आपल्या घरी गेले असून सध्या तालुक्यात बाधित रुग्णांची संख्या ६० आहे. कोरोनाचे रुग्ण माणगाव तालुक्यात दररोज वाढत चालल्याने नागरिकांनी सतर्कता व जागरूकता बाळगून सरकारने केलेल्या सुचनांचे पालन वेळोवेळी करा, असे आवाहन तालुक्याच्या प्रांताधिकारी प्रशाली जाधव दिघावकर यांनी केले आहे.

Comments