माणगाव नगरपंचायत हद्दीत नवे ११ कोरोना रुग्ण 

तालुक्यात १५ ; एकूण बधितांची संख्या पोहचली ४३ वर


सलीम शेख
            माणगाव : जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना नामक संसर्गजन्य विषाणूने काही दिवसांपासून माणगाव नगरपंचायत हद्दीतील ग्रामस्थांची चिंता वाढवली आहे. नगरपंचायत हद्दीत कोरोनाचे नवे ११ रुग्ण तर तालुक्यातून १५ रुग्ण आढळल्याने सर्वांनीच आता कोरोनाची धास्ती घेतली आहे. तालुक्यात सध्यस्थितीत एकूण बाधितांची संख्या ४३ वर पोहचली असून यापैकी निम्म्याहून अधिक रुग्ण हे माणगाव नगरपंचायत हद्दीतील आहेत. त्यामुळे याठिकाणी प्रशासनाचेही धाबे दणाणले आहेत. विशेष म्हणजे माणगावात बाधित रुग्णांपैकी दोन कुटुंबातील ११ जणांचा या रुग्णांमध्ये समावेश आहे.
          माणगाव तालुक्यात लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यापासून कोरोना रुग्ण आढळण्यास सुरुवात झाली. त्यानंतर तालुक्यातून सुमारे ३० गावांहून आतापर्यंत १०९ जणांना कोरोनाची लागण झाली असून त्यापैकी ६४ रुग्ण हे आपल्या स्वतःच्या इच्छाशक्ती व प्रतिकार शक्तीच्या जोरावर पूर्णपणे बरे होऊन आपल्या घरी गेले आहेत. तर सध्या ४३ रुग्ण बाधित असून दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. माणगाव नगरपंचायत हद्दीत ११ रुग्ण, सुर्ले गावातील २ रुग्ण, ढालघर फाटा येथील १ रुग्ण व कोल्हाण येथील १ रुग्ण यांचा स्वॅब रिपोर्ट ३० जून २०२० रोजी रात्री उशिरा पॉझिटिव्ह आल्याची माहिती माणगाव तालुक्याच्या तहसीलदार प्रियंका आयरे कांबळे यांनी दिली. माणगाव नगरपंचायत हद्दीत लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्यापासून एक दोन दिवस आड सातत्याने कोरोना रुग्ण आढळत असल्याने हद्दीतील ग्रामस्थांनी याची चांगलीच धास्ती घेतली आहे. सध्या हद्दीत २५ हून अधिक रुग्ण बाधित आहेत. यासाठी हद्दीतील ग्रामस्थांबरोबरच तालुक्यातील इतर गावांहून माणगावात कामाधंद्यानिमित्त येणाऱ्या जनतेने सतर्कता व जागरूकता बाळगा, यासाठी मास्क व वेळोवेळी सँनिटायझर वापरा, खरेदी करताना गर्दी करू नका, सोशल डीस्टन्सिंग (सुरक्षित अंतर) ठेवा, खोकताना, शिंकताना तोंडावर रुमाल धरा अशा सरकारतर्फे देण्यात आलेल्या सर्व सुचनांचे काटेकोर पालन करून प्रशासनाला सहकार्य करा अशी कळकळीची विनंती तालुक्याच्या तहसीलदार  प्रियंका आयरे कांबळे यांनी केली आहे.

Comments