माणगावात केंद्र सरकार विरोधात काँग्रेसची निदर्शने

माणगावात केंद्र सरकार विरोधात काँग्रेसची निदर्शने 

तहसीलदारांना दिले निवेदन


सलीम शेख

         माणगाव : उत्तर प्रदेशात काँग्रेस नेते खा. राहुल गांधी यांना झालेल्या अटकेचा निषेध करण्यासाठी तसेच देशातील शेती व शेतकरी यांच्या विरोधात केंद्र सरकारने मोठे षडयंत्र रचल्याचे सांगत माणगावात मोर्बा रोड नाका याठिकाणी रायगड जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष ज्ञानदेव पवार यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस कार्यकर्त्यांनी शुक्रवार दि. २ ऑक्टोबर २०२० रोजी जोरदार निदर्शने करून आंदोलन करीत माणगाव तहसीलदार प्रियंका आयरे कांबळे यांना याबाबतचे  निवेदन काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानदेव पवार, तालुकाध्यक्ष विलास सुर्वे, जिल्हा चिटणीस डॉ. नरेंद्र सिंह यांनी दिले.

         माणगाव तालुका काँग्रेसतर्फे तहसीलदार यांना देण्यात आलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, मोदी सरकारने देशातील शेती व शेतकरी यांच्या विरोधात मोठे षडयंत्र रचले आहे. केंद्रातील भाजप सरकारने तीन काळ्या कायद्याच्या माध्यमातून देशातील हरित क्रांती नष्ट करण्याच्या कुटील डाव रचला आहे. जगाचा पोशिंदा, अन्नदाता शेतकरी आणि शेतमजूर यांना काही उद्योगपतींचे गुलाम बनविण्याचे हे एक मोठे षडयंत्र आहे. देशातील शेतकरी, शेतमजूर, कामगार, कर्मचारी व  लाखो लोकांचे या विधेयकांवर आक्षेप आहेत. तसेच उत्तरप्रदेशातील हाथरस येथील एका १९ वर्षीय युवतीवर झालेला अत्याचार व हत्याप्रकरणी या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी निघालेले काँग्रेसचे खा. राहुल गांधी यांना उत्तरप्रदेश पोलिसांनी अटक केल्याचा निषेधार्थ माणगावात काँग्रेसतर्फे जोरदार निदर्शने करण्यात आले. यावेळी काँग्रेसचे महाड विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष जनार्दन मानकर, काँग्रेस कार्यकर्ते, बाळा पवार, सुनील चव्हाण, संतोष पोळेकर, काशिराम पवार, अनंता पवार, बाबू पाखूर्डे, सुमित सूर्यकांत काळे, सचिन मांजरे, महेश पवार, नरेश चाळके, संजय मालोरे, शुभम शिंदे, अनिकेत पवार आदींसह तालुक्यातील कॉंग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Comments