आयपीएल क्रिकेटवर सट्टा लावणाऱ्यांवर रायगड पोलिसांची धडाकेबाज कारवाई
कारवाईत १६ मोबाइल जप्त
मनोज कळमकर
खालापूर : सध्या भारतातील अत्यंत लोकप्रिय क्रिडा स्पर्धा असणारी ‘इंडियन प्रिमीयर लिग’ ही क्रिकेट स्पर्धा दुबई, शारजा व अबुधाबी या ठिकाणी सुरू आहे. जगभरातील क्रिकेट प्रेमींचे अमाप मनोरंजन करणारी ही स्पर्धा कधी सुरू होते याबाबत जशी उत्सूकता असते तेवढीच उत्सुकता या स्पर्धेच्या दरम्यान सट्टा खेळणाऱ्या बुकींना देखील असते.
१९ सप्टेंबर २०२० रोजी ‘आयपीएल-2020’ ला सुरूवात झाली. स्पर्धेवर सट्टा लावणाऱ्यांवर विशेष लक्ष केंद्रीत करून अशा काही हालचाली आढळून आले होते. त्वरीत कायदेशिर कारवाई करण्याकरिता जे. ए. शेख, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, रायगड यांना सूचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे त्यांनी त्यांचे गोपनिय बातमीदार यांना सतर्क केले होते. प्राप्त गोपनिय माहितीच्या आधारे दिनांक १ ऑक्टोबर २०२० रोजी रात्रौ १०.२० वाजता जे. ए. शेख, पोलीस निरीक्षक यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा पथकाने मौजे खांडपे ता. कर्जत येथील हॉटेल ००७ युनिव्हर्स रिसाँर्टच्या रूम नंबर १२० मध्ये छापा टाकला. त्या ठिकाणी आरोपीत कांती करमसीभाई वारसुंगीया, वय-43, रा. कोपरी ठाणे, प्रकाश पोपट पुजारी, वय-42, रा. मुलूंड मुंबई असे दोघेजण आयपीएल मधील किंग्ज ईलेव्हन पंजाब व मुंबई इंडियन्स या दोन संघांमध्ये सुरू असणाऱ्या क्रिकेट सामन्यावर सट्टा खेळतांना आढळून आले. त्यांच्या ताब्यातून सट्टा खेळण्यासाठी वापरत असलेले एकूण ५ मोबाईल फोन, कॅल्क्यूलेटर व इतर साहित्य जप्त करण्यात आले.
त्यांच्याकडे अधिक तपास केला असता सदरचे आरोपीत हे वेगवेगळया मोबाईल फोन्सच्या माध्यमातून वेगवेगळया मोबाईल ऍप्स व आयडी यांच्या मदतीने आयपीएल क्रिकेट सामन्यांवर सट्टा खेळत असल्याचे यावेळी आढळून आले. नमूद दोन्ही आरोपीत यांच्याकडून एकूण २० मोबाईल आयडी यांची माहिती मिळून आलेली असून या २० मोबाईल आयडी पैकी एकूण ४ मोबाईल आयडी या आरोपीत यांनी सट्टा खेळण्याकरिता वापरल्या असल्याची माहिती तपासा दरम्यान मिळून आलेली आहे. या मोबाईल फोनमध्ये आढळून आलेले सिमकार्डही नमूद आरोपीत यांनी इतर कोणातरी इसमांच्या नावांवर नोंदणीकृत करून घेतलेली असल्याचेही त्यांच्याकडे केलेल्या तपासामध्ये निष्पन्न झाले. त्या अनुषंगाने कर्जत पोलीस ठाणे येथे कॉ.गु.र.नं. 176/2020, भा.द.वि.सं.क. 420, 465, 468, 471, 34 सह महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम कलम 4 (अ), 5 तसेच इंडियन टेलिग्राफ ऍक्ट 1985 चे कलम 25 (क) व माहिती तंत्रज्ञान अधिनियम सन 2000 चे कलम 66 (ड) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्ह्याचा तपास जे. ए. शेख, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा हे करीत आहेत.
सदर गुन्हयाच्या आतापावेतो करण्यात आलेल्या तपासामध्ये ऑनलाईन सट्टा खेळण्याकरिता व खेळविण्याकरिता अटक आरोपीत वापरत असलेले एकूण 16 मोबाईल फोन्स जप्त करण्यात आलेले आहेत. सदरची कारवाई ही मावळते पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ यांच्या मार्गदर्शनानुसार पोलीस निरीक्षक जे. ए. शेख यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील स.पो.नि. संदीप पोमण, पो.उ.नि. सचिन निकाळजे, पो.उ.नि. अभिजीत देशमुख यांनी ही कारवाई केली.
Comments
Post a Comment