१०८ अॅम्ब्युलन्स सेवा पुर्ववत करावी - संतोष पवार
घन:श्याम कडू
उरण : येथील सामाजिक संस्थेने दाखल केलेल्या याचिकेवर दोन १०८ अॅम्ब्युलन्स उरण तालुक्याला मंजूर केल्या होत्या. त्यानुसार दोन ते अडीच महिने उरणकरांना सेवा मिळाली त्यानंतर गेली एक वर्ष कोरोना महामारीतही १०८ सेवेला फोन करून २ तासाच्या आत अॅम्ब्युलन्स मिळाली नाही. तरी याची चौकशी करून उरणकरांना त्वरित १०८ अॅम्ब्युलन्सची सेवा मिळावी अशी मागणी उरण सामाजिक संस्थेचे सचिव संतोष पवार यांनी केली आहे.
मुंबई उच्च न्यायालयातील ऍडव्होकेट जनरल आशुतोष कुंभकोणी यांनी उरण सामाजिक संस्थेच्या जनहित याचिकेच्या अनुषंगाने बी. व्ही. जी. कंपनीचे मालक जे राज्यात १०८ अॅम्ब्युलन्सची सेवा देण्याचे काम करत आहेत. त्यांना दोन १०८ अॅम्ब्युलन्स उरण तालुक्याकरीता ज्या मंजूर आहेत त्या तात्काळ सूरू करा म्हणून सांगितल्याप्रमाणे दोन ते अडीच महिने अॅम्ब्युलन्सची सेवा उरणकरांना मिळाली. परंतू त्यानंतर गेले एक वर्ष प्रामुख्याने या करोना या महामारीच्या काळात जिथे रूग्ण घेऊन जाणे करिता १०८ सेवेला फोन केल्यावर दोन तासांच्या आत एकदाही अॅम्ब्युलन्स सेवा मिळालेली नाही. याबाबत सातत्याने डिस्ट्रीक्ट को-ऑर्डीनेटर किरण गायकवाड यांच्या अनेक वेळेला लक्षात आणून दिले असतानाही सदर अॅम्ब्युलन्स उरणवासियांना उपलब्ध होत नाही हे उरणकरांचे दुर्दैव आहे. सदर अॅम्ब्युलन्स जर उरणकरीता मंजूर आहेत आणि त्या इतर तालुक्याच्या नावाने वापरल्या जात असतील तर हा फार मोठा भ्रष्टाचार आहे असा आरोप उरण सामाजिक संस्थेचे सरचिटणीस संतोष पवार यांनी डिस्ट्रीक्ट को-ऑर्डीनेटर किरण गायकवाड यांच्याकडे व्यक्त केले आहे. तसेच सदर अॅम्ब्युलन्स दोन - तीन तासांनंतर कधीही वेळेवर रूग्णांना उपलब्ध न झाल्यामुळे रूगालयात रूग्ण उशीरा पोहोचल्यामुळे रूग्णांची अवस्था गंभीर झाली आहेत. अशी अनेक उदाहरण सांगता येतील. तसेच याबाबत मा. प्रधान सचीव, आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन यांच्याकडे चौकशी करण्याबाबतचा पत्रव्यवहार करणार असल्याचे सांगूनही १०८ अॅम्ब्युलन्स सेवेत सुधारणा झाल्याचे दिसून येत नाही. तरी याची चौकशी करून उरणकरांना त्वरित १०८ अॅम्ब्युलन्सची सेवा मिळावी अशी मागणी संतोष पवार यांनी केली आहे.
Comments
Post a Comment