औद्योगिकदृष्ट्या प्रगत उरण वैद्यकीय सेवेने पोरका
संग्रहित
घन:श्याम कडू
उरण : कोरोना महामारीवर मात करण्यासाठी त्वरित कोविड हॉस्पिटल उभारण्याचे सूतोवाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले होते. त्या धर्तीवर या संदर्भात अधिकारी वर्गांनी पहाणी दौरा केला होता. त्याला आता १० ते १५ दिवसांचा अवधी उलटूनही कोविडचे हॉस्पिटल काही सुरू झाले नाही. औद्योगिकदृष्ट्या प्रगत असलेला उरण वैद्यकीय सेवेने पोरका असल्याची चर्चा उरणच्या जनतेत सुरू आहे.
रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे उरणमध्ये येणार आहेत तरी त्यांनी लक्ष घालून कोविड हॉस्पिटलचा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी जोर धरू लागली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सुचनेनुसार नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी उरणमध्ये सुसज्ज हाॅस्पीटल आणि तात्काळ १०० बेडचे कोविड हाॅस्पीटल सुरू करण्याबाबतचे आदेशाबाबत सिडको आणि रायगड जिल्हा प्रशासनाकडून वेळकाढूपणा होत आहे. जर उरणमध्ये हाॅस्पीटल/ वैद्यकीय सेवेअभावी कोरोना मृत्यूचे प्रमाण वाढले तर वैयक्तीक कोणत्या अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करायची असा प्रश्न उरणची जनता विचारीत आहे.
आपत्ती निवारण अचूक अशा व्यवस्थापन कौशल्याशी संबंधीत आहे. ते कोणाच्याही लहरीनुसार अथवा अधिकाऱ्यांच्या सोईनुसार, मनमानी कारभारानुसार होता कामा नये. नंतर संकटांची मालिका सूरू होणार कारण उरण औद्योगिकदृष्ट्या जगाच्या नकाशावर असलेला तालुका आहे सर्व व्यवसायाचा कणाच ठप्प होतील. याचा प्रशासनाला नेहमीच विसर पडत आहे. याकामी शासन व्यवस्थेने इथल्या ओएनजीसी, जेएनपीटी, बीपीसीएल, जिटीपीएस, एनएचएआय, जिटीआय, एनएसआयसीटी, आयोटीएल यांच्यासह इतर अनेक प्रकल्पांच्या सहकार्याने कोविड हॉस्पिटल उभारणे आवश्यक आहे. किंबहूना ती जबाबदारीच आहे. परंतू असे झाले नाही तर या उरण तालुक्याला असे वैद्यकीयदृष्ट्या दुर्लक्षित ठेवल्यामुळे पुन्हा एका भयंकर अशा आर्थीक आणि सामाजिक परीस्थितीला देशाला सामोरे जावे लागेल याचा नेहमीच सर्वांना विसर पडतो आहे आणि आजही पडत आहे.
खरोखर संबंधीत आधिकारी वर्गावर जबाबदारी आजच निश्चित झालीच पाहीजे. अशी मागणी उरण सामाजिक संस्थेतर्फे करण्यात येत आहे. या सर्व महत्वाच्या प्रकल्पात येथील स्थानिक जनता काम करत आहे आणि हे सर्व प्रकल्प देशाच्या व्यापार आणि अर्थ व्यवस्थेत अतीशय महत्वाचे आहेत. परीस्थिती हाता बाहेर गेली तर फक्त उरणवासी नाही तर देश सफर होणार आहे. शाश्वत विकासात आपत्ती आडसर निर्माण करतात तर माध्यमे माहितीच्या आधारे संकटाची तीव्रता कमी करतात. काहीही असले तरी उरणकरांसाठी कोरोना हॉस्पिटलची नितांत गरज आहे. अन्यथा मुख्यमंत्री व नगरविकामंत्री यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवित उपेक्षित ठेवीत फक्त नेहमीप्रमाणे आश्वासनावरच ठेवले असल्याची चर्चा उरणमध्ये सुरू आहे.
Comments
Post a Comment