सर्पदंश झालेल्या आदिवासी रुग्णाचे हाल
आधी कोप्रोली आरोग्य केंद्रात फरफट
डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटलने मध्यरात्री रुग्णाला दिले हाकलून
वार्ताहर
जेएनपीटी : शेतात काम करताना चिरनेर ग्रामपंचायत हद्दीतील चांदीयली वाडी येथील नरेश इक्या कातकरी (वय ५५) याला मंगळवार दि. २९ रोजी विषारी सापाने दंश केला होता. त्याला उपचारासाठी प्रथम कोप्रोली प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. तिथं डॉक्टर नसल्याने रुग्णाची स्थिती नाजूक बनत होती. मात्र सुट्टीवरील दुसरे डॉक्टर डॉ. चोरमुळे यांनी येऊन प्राथमिक उपचार केले आणि पुढील उपचारासाठी डॉ. डी वाय पाटील हॉस्पिटल नेरुळ येथे हलविण्यास सांगितले. त्यांनी संध्याकाळी दाखल करून घेतले पण मध्यरात्री या रुग्णाला आणि त्याच्या नातेवाईकांना आयसीयु नसल्याचे सांगत बाहेर काढले. डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल नेरुळच्या या माणुसकीशून्य कृतीने गरीब असहाय आदिवासी रुग्णांवर उपचार सोडाच पण रात्रभर घरी पायी चालत येण्याचा प्रसंग ओढवला आहे.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की नरेश यास सर्पदंश झाल्यानंतर त्याच्या नातेवाईकांनी कोप्रोली आरोग्य केंद्रात धाव घेतली. मात्र तिथं त्या दिवशी कार्यरत असणारे डॉ. राजाराम भोसले उपस्थित नव्हते. डॉक्टर नसल्याने रुग्णाच्या जीवाला धोका निर्माण झाला. त्यात रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने आदिवासी बांधवांसमोर मोठे संकट ओढावले असताना, सामाजिक कार्यकर्ते आणि जिव्हाळा फाऊंडेशनचे अध्यक्ष रुपेश पाटील, पंकज ठाकूर यांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी आरोग्य केंद्रात धाव घेत रुग्ण आणि त्याच्या नातेवाईकांना धीर दिला. तत्परतेने याच आरोग्य केंद्राचे सुट्टीवर असलेले दुसरे वैद्यकीय डॉ. चोरमुळे यांना पाचारण केले. त्यांनी रुग्णावर उपचार करून त्यास पुढील खबरदारीसाठी नवी मुंबईत हलवण्यास सांगितले.
एकंदरीत नरेश कातकरी यांच्यावरील संकट तात्पुरते टळले असले तरी त्यास पुढे नेण्याची गरज होती. आरोग्य केंद्रातील रुग्णवाहिका नादुरुस्त असल्याने जिव्हाळा फाऊंडेशनचे रुपेश पाटील आणि पंकज ठाकूर यांनी खासगी वाहन घेऊन रुग्ण आणि त्याच्या नातेवाईकांसह नवी मुंबईतील डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल गाठले आणि उपचार सुरू केले. ते तिथून परतून येताच मध्यरात्री आयसीयु बेड उपलब्ध नसल्याचे सांगत आदिवासी रुग्णाला बाहेर काढले. रुग्ण आणि त्याचे नातेवाईक गयावया करत असतानाही या आदिवासी रुग्णावर रात्रीच्या वेळी माणुसकीशून्य व्यवहार हॉस्पिटलने केला असल्याने आदिवासी बांधवांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे.
याबाबत रुग्णांचा मुलगा महेंद्र कातकरी याने सांगितले की आम्ही हॉस्पिटलला विनवणी केली. आम्ही अशिक्षित आहोत, आमच्याकडे पैसे नाहीत, काय करायचं, कुठं जायचं याची माहिती नाही. मात्र त्यांनी ऐकले नाही, तुम्ही कुठंही जा, काहीही करा आम्हांला काहीही देणं घेणं नाही, असं सांगत हाकलून दिलं. तिथून आम्ही घरी आलो आहोत. हॉस्पिटलच्या या माणुसकीशून्य कृतीने रुग्णाचा हात निकामी होण्याची शक्यता फ्रेंड्स ऑफ नेचरचे जयवंत ठाकूर यांनी व्यक्त केली आहे.
कोप्रोली प्राथमिक आरोग्य केंद्रातील कामचुकार डॉक्टर राजाराम भोसले याचा कर्तव्यात कसूर करण्याबाबत तसेच डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालय नेरुळ यांच्या रुग्णा बद्दलच्या गैरवर्तनाची तक्रार मुख्यमंत्री, आरोग्य मंत्री, आदिवासी मंत्री तसेच आरोग्य विभागाला करणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते तथा जिव्हाळा फाऊंडेशनचे रुपेश पाटील यांनी सांगितले.
Comments
Post a Comment