पेझारी येथे हाणामारी; एकाचा मृत्यू
५ जण अटकेत
वार्ताहर
अलिबाग : तालुक्यातील पेझारी येथे झालेल्या हाणामारीत एकाचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी (11 ऑक्टोबर) रोजी घडली. याप्रकरणी 5 जणांना अटक करण्यात आली असून आणखी आठ जणांचा शोध सुरु आहे. लग्नापूर्वीच दोन कुटुंबात वाद झाला. वादाचे पर्यावसान हाणामारीत होऊन यामध्ये नवर्याच्या मोठ्या भावाला जीव गमवावा लागला.
पेझारी येथील एका मुलीचे लग्न बदलापूर येथील मुलासोबत ठरले होते. या दोघांचा साखरपुडाही झाला होता. मात्र साखरपुड्याच्या कार्यक्रमात मुलीकडील फोटोग्राफरने मुलाच्या लहान बहिणीचा नंबर मागितला. तसेच ओळख वाढविण्याचा प्रयत्न केला. मात्र ही बाब मुलाच्या घरच्यांना आवडली नाही. यावरुन दोन कुटुंबात वाद सुरु झाले.
मुलाच्या घरच्यांनी त्या फोटोग्राफरला माफी मागायला सांगा, असे मुलीकडच्या मंडळींना सांगितले. तसेच माफी मागितली नाही तर लग्न करणार नाही, असेही कळवले. मात्र याकरिता मुलीच्या घरचे तयार नव्हते. या विषयावरुन रविवारी पेझारी येथील साई वाटीका हॉटेलजवळ दोन्ही कुटुंबांनी बैठक बोलावली. वाद चिघळत जाऊ नये म्हणून प्रत्यक्ष भेटून विषय संपवून टाकू, असे सांगितले. त्यानुसार नवरा मुलगा, त्याचे तीन भाऊ आणि गाडी चालक असे पाचजण रविवारी पेझारीला आले. पेझारी येथील साई वाटीका हॉटेलजवळ दोन्ही पक्षाच्या लोकांमध्ये बोलणी सुरु झाली. आवाज वाढू लागले. दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास हॉटेलबाहेेर जोरदार बाचाबाची सुरु झाली. ते पाच आणि हे दहा ते बारा जण. त्यांनी नवरा मुलगा आणि त्याच्या भावाला मारहाण करण्यास सुरुवात केली. पोलिसांना याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले. त्यांनी दोन्ही पक्षाच्या लोकांना पोलीस ठाण्यात नेले. तिथे कार्यवाही सुरु असताना नवर्याचा भाऊ विठू जनार्दन तुपट (33) याला त्रास जाणवू लागला.
पोलिसांनी त्यांना मेडीकल करण्यास सांगितले. त्यानुसार तुपट आणि अन्य पोयनाड येथील आरोग्य केंद्रात केले. मात्र त्यांच्याकडे पोलिसांचे पत्र नसल्याने त्यांना दाखल करुन घेतले नाही. त्यामुळे अलिबाग जिल्हा रुग्णालयात दाखल होण्यास सांगितले. रुग्णालयात उपचार सुरु असतानाच विठू तुपट याचा मृत्यू झाला. विठू याच्यामागे दोन लहान मुली आहेत. एका किरकोळ वादातून एक जीव तर गेलाच; परंतु दोन लहानग्यांचे वडीलही गमावले आहेत. दरम्यान, याप्रकरणी पोयनाड पोलिसांनी हत्येसह मारहाणप्रकरणी गुन्हे दाखल केले असून पाच जणांना अटक करण्यात आली आहे. तर फरार असलेल्या आठ जणांचा शोध सुरु असल्याची माहिती तपास अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक सुहास आव्हाड यांनी दिली. आज या अटकेतील पाच जणांना अलिबाग येथील न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. अधिक तपास सुुरु आहे.
Comments
Post a Comment