बाळाच्या पालकांना लुटण्याचा हॉस्पिटलचा प्रयत्न कांतीलाल कडू यांनी हाणून पाडला!

बाळाच्या पालकांना लुटण्याचा हॉस्पिटलचा प्रयत्न कांतीलाल कडू यांनी हाणून पाडला!

महात्मा फुले योजनेतून 2 लाख 31 हजार रूपये करून घेतले चुटकीसरशी मंजूर


पनवेल

        प्रतिनिधी : महात्मा फुले योजनेचे पंचाऐंशी हजार रूपये मंजूर झाले होते. मात्र, पुढच्या उपचारांसाठी बाळाला दुसरीकडे हलविण्याचा निर्णय पालकांनी घेताच योजना लागू होत नसल्याचे सांगून मंजूर रक्कमेसह २ लाख ३६ हजार रुपयांचे बिल भरण्याचा तगादा नवी मुंबईतील डी. वाय. पाटील हॉस्पिटलने लावला. सर्व पैसे भरल्याशिवाय बाळाला देता येणार नसल्याची तंबीही दिली. तेव्हा सामाजिक कार्यकर्ते कांतीलाल कडू यांनी हॉस्पिटलला वठणीवर आणले आणि पाच हजार अनामत रक्कम वगळून २ लाख ३१ हजार रूपये योजनेतून मंजूर करत हॉस्पिटलने पालकांचा लूट करण्याचा केलेला प्रयत्न हाणून पाडला.

        ४ सप्टेंबरला खोपोली येथील एका मातेने (सध्या रा. खारघर) आठव्या महिन्यात नवी मुंबईतील डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये बाळाला जन्म दिला. ९ सप्टेंबरला बाळाच्या उपचारांसाठी हॉस्पिटलने दिलेल्या खर्चाच्या अंदाजपत्रकावरून महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेतून फक्त पंचाऐंशी हजार रूपये मंजूर करण्यात आले असल्याचे कोवळ्या बाळाच्या पालकांना सांगण्यात आले.

         गेल्या सत्तावीस दिवसात बाळाच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने पालकांनी त्याला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये हलविण्याचा निर्णय घेवून डी. वाय. पाटील हॉस्पिटल प्रशासनाला कळविले. तेव्हा, बाळ दुसरीकडे नेणार असाल तर महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचे मंजूर झालेल्या पंचाऐंशी हजार रुपयांसह एकूण २ लाख ३६ हजारांचे पूर्ण बिल भरावे लागेल असे ठणकावून सांगत पालकांना लुटण्याचा प्रयत्न हॉस्पिटलने सुरू केला. बाळाच्या उपचारांसाठी व्याकुळ झालेल्या पालकांनी विनंती करूनही हॉस्पिटल प्रशासन त्यांचा उद्धटपणा सोडायला तयार नव्हते. अखेर पालकांनी पनवेल संघर्ष समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांना साद घातली. सेवेशी तत्पर असलेल्या कडू यांनी तातडीने हॉस्पिटल प्रशासनाच्या विविध विभागाला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने आणि बिल भरण्याचा पालकांना धोशा लावल्याने कडू यांनी प्रशासनाला वठणीवर आणले. त्यांनी महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधाकर शिंदे यांना डी. वाय. पाटील हॉस्पिटलच्या बिलाची प्रत पाठवून संपूर्ण बिलाची रक्कमच काही मिनिटात मंजूर करून घेतली. त्यामुळे अनामत रक्कमेचे भरलेले पाच हजार रूपये वगळता २ लाख ३१ हजार रूपये योजनेत वळते करून पालकांना कडू यांनी दिलासा दिला आणि लूट करण्याचा हॉस्पिटलचा प्रयत्न हाणून पाडला. त्यानंतर निमूटपणे हॉस्पिटलने बाळाला निरोप दिला. आता ते बाळ नवीन पनवेलच्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे.

Comments