ऑनलाईन सातबारा साठी तलाठी घेत असलेले १५ रुपये शासन जमा झालेच नाहीत?

ऑनलाईन सातबारासाठी तलाठी घेत असलेले १५ रुपये शासन जमा झालेच नाहीत?

पोलीस मित्र संघटनेचे सोमवार पासून आंदोलन 



गणेश पवार

            कर्जत : १८ मार्च २०१४ पासून शासनाने ऑनलाइन पध्दतीने सातबारा उतारा आणि फेरफार देण्यास सुरुवात केली आहे.त्यावेळी प्रत्येक एका कागदासाठी शासनाच्या नियमाप्रमाणे १५ रुपये घेतले जात आहेत. मात्र कर्जत तालुक्यातील सर्व तलाठी कार्यालये यांच्याकडून २०१९ पर्यंत एकदाही संबंधित १५ रुपये मधून गोळा होणारी रक्कम शासनाकडे जमा केलेली नाही. दरम्यान,महसूल खात्यातील या कथित भ्रष्टाचाराविरुद्ध पोलीस मित्र संघटना आक्रमक झाली असून सोमवार ७ डिसेंबरपासून आक्रमक होऊन आंदोलन करणार आहे.

                   मार्च २०१४ पूर्वी राज्यातील तलाठी सजा मधून त्यांच्या शेती संबंधित सर्व उतारे शेतकऱ्यांना मोफत जात होते.मात्र १८ मार्च २०१४ रोजी निर्णय घेऊन राज्य सरकारने सातबारा उतारे आणि फेरफार तसेच आठ अ आदी उतारे तलाठी कार्यालयात ऑनलाइन पद्धतीने मिळतील आणि त्यासाठी प्रत्येक कागदाला १५ रुपयांचा दर लावण्यात येईल असे जाहीर केले होते.कर्जत तालुका हा शेती प्रधान तालुका असून या तालुक्यात शेती बरोबर जमीन विकसित करण्याचे प्रमाण देखील मोठे आहे. ही बाब लक्षात घेता २०१४ पासून आजतागत कर्जत तालुक्यातील २८ तलाठी सजा कार्यालयात हजारो उतारे शेतकऱ्यांनी काढून घेतले आहेत. त्यावेळी त्या सर्व शेतकऱ्यांनी १५ रुपये एका कागदाला खर्च देखील केले आहे.मात्र अनेकदा त्याची पावती देखील दिली जात नव्हती.त्यामुळे याबाबत तक्रारी आल्यानंतर पोलीस मित्र संघटनेचे कार्यकर्ते यांनी कर्जत तहसिल कार्यालयात माहितीचे अधिकाराचा वापर करून माहिती मागविली.ती माहिती लक्षात घेता पोलीस मित्र संघटनेला त्या ऑनलाइन शेती उताऱ्या मधील गोम समजून आली आहे. १५ रुपये प्रति उतारा आकारल्यानंतर त्यातील १० रुपये हे प्रिंटर आणि संगणक खर्च वगळून शिल्लक राहिलेली पाच रुपयांची रक्कम कोणत्याही तलाठी कार्यलयाकडून शासनाला जमा झालेली नाही.

              २०१४ पासून २०१९ पर्यंत ही रक्कम प्राप्त झाली नसल्याने रायगड जिल्ह्यात सामाजिक प्रश्नावर काम करणाऱ्या पोलीस मित्र संघटनेने आवाज उठविला आहे. जानेवारी २०१९ पासून या प्रश्नांचा पाठपुरावा केल्यानंतर देखील शासनाने याबाबत कोणताही निर्णय घेतला नाही. कर्जत तहसिल कार्यालयाकडून कोणतीही कार्यवाही या प्रकरणी होत नसल्याने कर्जत प्रांत अधिकारी कार्यालयाकडे पोलीस मित्र संघटनेने दाद मागितली होती.परंतु कोणत्याही यंत्रणेने ऑनलाइन दाखले देताना गोळा करण्यात आलेल्या रकमेचा हिशोब शासनाकडे जमा केला नाही. त्यामुळे अखेर पोलीस मित्र संघटना ७ डिसेंबर पासून आंदोलन सुरू करणार आहे. कर्जत प्रांत अधिकारी कार्यालयाबाहेर पोलीस मित्र संघटनेचे जिल्हा अध्यक्ष किशोर शितोळे, जिल्हा सचिव रमेश कदम, जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर साळोखे, दशरथ मुने आणि तालुका अध्यक्ष उत्तम ठोंबरे हे आपल्या सहकारी यांच्यासमवेत ठिय्या आंदोलन करणार आहेत. ७ डिसेंबर ते ९ डिसेंबर या काळात प्रांत अधिकारी कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन केल्यानंतर १० डिसेंबर पासून १२ डिसेंबर पर्यंत आमरण उपोषण केले जाणार आहे. त्यातून देखील शासनाने संबंधित यंत्रणेवर शिस्तभंगाची आणि कर्तव्यात कसूर केल्याबददल कारवाई केली नाही तर पोलीस मित्र संघटनेचे कार्यकर्ते आत्मदहन आंदोलन करणार आहेत.

Comments